सावद्यात प्रतिबंधीत तंबाखूसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावदा –येथील सावदा – फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून डायमंड टोल काट्यासमोर उभ्या असलेल्या एका ट्रकमधून सुमारे 6 लाख 72 हजारांचा आरोग्यास अपायकारक आणि प्रतिबंधीत असलेला मिराज तंबाखू आणि ट्रक असा तब्बल दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आलेली असून एक जण फरार झालेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथील सावदा – फैजपूर रोडवरील डायमंड तोलकाट्या समोर सार्वजनिक जागी दिनांक 25 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम.पी.09 के.सी.6897 हा उभा असताना यात संशयास्पदरित्या माल असल्याचा संशय आल्याने त्यास सावदा पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तपासणी केली असता त्यात विक्रीस परवानगी नसलेला “मिराज” तंबाखू आढळून आला, यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांना माहिती कळविण्यात आली.अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव यांनी सावदा येथे आल्यावर तपासणी केली असता सदर ट्रक मधून 6,72,000 रुपये किमतीचे 20 एचडीपीइ खोके एका खोक्यात 4 कार्टून खोके व प्रत्येक खोक्यात 42 लहान खोके आणि त्यात “मिराज” तंबाखू असा मुद्देमाल आढळून आला. सदरचा पदार्थ मानवी जीवनास अत्यंत हानिकारक असल्यामुळे सदरचा पदार्थ हा राज्यात उत्पादन, निर्मिती, साठवण, वाहतूक, व विक्रीस कायदेशीर प्रतिबंध घातलेला असताना त्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने सदर ट्रक चालक व सोबत असलेला अशा दोघांवर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.यातील चालक निर्मल मिलन सोलंखी,हा फरार झाला तर त्याचा साथीदार कमल सुभान मन्सुरे यास अटक करण्यात आलेली आहे. हे दोघे रा, बागफल, ता.बडवा, जि. खरगोन, (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत,
यातील आरोपी विरुद्ध अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव अरविंद वसंत कांडेलकर यांचे फिर्यादीवरून सावदा पोलिस ठाण्यात भाग 5 गु.र.नं.56/2020, भा.द.वी. कलम 328,272,273,188,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास स.पो.नि, उनवणे, नेमणूक निंभोरा पो.स्टे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक, आर.डी,पवार, पो.हे.का. संजय चौधरी, व सहकारी करीत आहे.
गुप्त माहिती वरून सापळा रचणारे पीसीओ सुरेश आढायगे, पी एस आय राजेंद्र पवार, उमेश पाटील,रिजवन पिंजारी,विशाल खैरनार,तुषार मोरे सामील होते.
दरम्यान सावदा परिसर हा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, व गुटखा विक्रीचे मोठे केंद्र ठरत असून येथून मध्यप्रदेश सीमा जवळ असल्याने येथून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असते.पोलिसांनी या कार्यवाहीत सातत्य ठेवत गुटखा तस्करांवर लगाम लावणे आवश्यक आहे.