“सीडी”तंत्र येणाऱ्या निवडणूकांवर प्रभावीपणे परिणाम करणार का?

जळगाव – काल जामनेर येथे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते आ.गिरीषभाऊ महाजन यांचेवर बीएचआर प्रकरणी आणि जामनेर नगरपरिषदेतील गैरव्यवहार , मविप्र शैक्षणिक संस्थांच्या जमीनी तसेच इतर भूखंडांविषयी भ्रष्टाचारासह इतर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. हे आरोप करीत असताना त्यांच्याकडे काही “संबंधित” व्यक्तींची “सीडी” आणि पेनड्राईव्ह असल्याचे ललवाणींनी पत्रकारांना दाखविले. मात्र त्या “सीडी” त असलेले “पिक्चर” दाखविलेले नाही. त्या सीडीत नेमके कोणाचे “पिक्चर” आहे ,आणि ते “पिक्चर” हे गैरकृत्याचे आहे कि गैरव्यवहाराचे याचा मात्र ललवाणी यांनी स्पष्ट खुलासा केलेला नाही. “पिक्चर तो अभी बाकी है” असे म्हणत हे “पिक्चर” आपण योग्य वेळी दाखविणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आता नवा “सीडी” तंत्राचा अध्याय सुरू झालेला आहे का? तसेच आता येणाऱ्या कालखंडात आणखी कोण-कोण अशा कथीत “सीडी” बाहेर काढणार? आणि “लावरे तो व्हिडिओ” असे कोणी बोलणार आहे का ? तशी कोणाला परवानगी मिळणार आहे का ? याबाबत जिल्ह्यातील नागरिक व राजकीय गोटात कुतुहुल निर्माण झालेले असून यावर आता खमंग चर्चांना उधाण आलेले आहे.
यापूर्वी निवडणूका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सूत्राचा राजकीय नेते प्रभावीपणे वापर करत होते. मात्र यापुढे भविष्यात येणाऱ्या निवडणूकांमध्ये अनेक राजकारणी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आणि विरोधकांचे चारित्र्य हनन करण्याबरोबरच त्यांना धमकावून नामोहरम करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी अशा कालबाह्य झालेल्या “सीडी” चा तर काही जण पेनड्राईव्ह किंवा मेमरी कार्डचा प्रभावीपणे ब्लॕकमेलिंग करण्यासाठी शस्त्र म्हणून नक्कीच वापर करतील. मात्र अशा या कथीत “सीडी” व पेनड्राईव्हमुळे काही राजकारणी लोकांची धाकधूक नक्कीच वाढलेली असणार आहे. आजपर्यंत धनाढ्य लोकांनाच पक्षातर्फे किंवा आघाडीतर्फे उमेद्वारी मिळण्याचा इतिहास आहे . मात्र येणाऱ्या कालखंडात निवडणूकांमध्ये अशा कथीत “सीडी”तंत्राचा प्रभावीपणे वापर करण्याला महत्त्व येणार आहे का? “सीडी” हीच मुख्य केंद्रस्थानी राहून ज्याचाकडे विरोधकांची कथीत “सीडी” तो “सीडी बहाद्दर” दळभद्री उमेदवार पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रबळ दावेदार असणार आहे का? तसेच निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा “सीडी”तंत्राची त्याला बेकायदेशीरपणे मदत होऊ शकते का ? असे प्रश्न उपस्थित केले जात असून त्यामुळे येणाऱ्या कालखंडात असले काही दळभद्री हौशेनवशे “सीडी फेम” उमेदवार नकली किंवा “ब्लँक” सीडी वापरून निवडणूकांमध्ये नक्कीच हैदोस घालणार यात तीळ मात्र शंका नाही. यात मात्र लोकशाहीचा गळा घोटला जाणार असून अशा “सीडी फेम” बहाद्दरांकडून होणाऱ्या ब्लॕकमेलिंगच्या प्रकारांना निवडणूकांमध्ये आळा घालून “सीडी”तंत्राचा प्रभाव कमी करण्याबरोबरच निवडणूका “सीडीतंत्र मुक्त” करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे.