सुडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी मीच- एकनाथराव खडसे
जळगाव – मविप्र प्रकरणात ॲड विजय पाटील यांनी आ.गिरीष महाजन यांचेसह अन्य लोकांवर निंभोरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात काल जळगाव येथे भाजप नेते आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदरील आरोप फेटाळून लावत हे सूडाचे राजकारण असून या षडयंत्रामागे कोणीतरी राजकीय नेत्याचा हात असू शकतो, अशी शक्यता वर्तविलेली होती.परंतु कोणाचेही नाव घेतलेले नाही. याबाबत आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत आमदार गिरीष महाजनांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. सूडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी मीच ठरलेला असून माझ्यावर मंत्री असताना आणि मंत्रीपद गेल्यानंतर अनेक खोटे व गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने त्या चौकशीला सामोरे गेलो, आणि अनेक गुन्ह्यांमध्ये मी निर्दोष सुद्धा सुटलेलो आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे.