आरोग्यमराठवाडा

हिवताप निर्मूलन महिना | पावसाळयात असे करा किटकजन्य आजार नियंत्रण व उपाययोजना

हिवताप प्रतिरोध मास | पावसाळयात असे करा किटकजन्य आजार नियंत्रण व उपाययोजना

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांचा मार्गदर्शनपर विशेष लेख….

 पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. डेंग्यू, चिकुनगुन्या, हिवताप असे आजार होवू नये यासाठी प्रत्येकाचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागानेच डेंग्युसारख्या आजारापासून आपण मुक्ती मिळवू शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अजीत पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी संयुक्तरीत्या केले आहे.

कीटकजन्य आजारामध्ये हत्तीरोग, हिवताप, जपानी मेंदुज्ज्वर, डेंग्यू, चिकुनगुन्या, चंडीपुरा काला आजार यासारखे आजार होतात. यापैकी हिवतापाचा प्रसार ऍनाफिलिस डासाच्या जातीच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात उदाहरणार्थ पाण्याच्या टाक्या, कुलरचे पाणी, रांजण, माठ, स्वच्छ पाण्याची डबकी आदिसारख्या साठवलेल्या पाण्यात होते. डास हिवताप रुग्णास चावतो. त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. असा दूषित डास निरोगी माणसास चावल्यास 10 ते 12 दिवसांनी थंडी वाजून ताप येवून डासाव्दारे हिवतापाचा प्रसार होतो. त्यादृष्टीने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आजार टाळण्यासाठी उपाययोजना : कीटकजन्य आजार टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती होवू न देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी साचलेले पाणी वाहते करा. पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्ड्याचा वापर करावा. घरासह सभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा, गप्पीमासे पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा खराब ऑईलचे थेंब टाका, सर्व पाण्याचे साठे झाकून बांधून ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. निरूपयोगी विहिरीत व साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. सायंकाळच्या वेळेस घराचे दारे खिडक्या बंद ठेवाव्यात व गोठ्यात पाला पाचोल्याचा धुर करावा, डुकरांना गावापासून दूर ठेवावे, दररोज मच्छरदाणीचा वापर करा. संडासच्या वेंट पाईपला जाळी अथवा कपडा बसवणे, नाल्या वाहत्या करणे इ.

शनिवारी कोरडा दिवस पाळावा :

कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी आठवड्यातून शनिवार हा एक दिवस कोरडा म्हणून पाळावा. या दिवशी पाण्याची टाकी, रांजण, माठ, वॉटर कुलर, फ्रीजच्या मागील पाणी रिकामे करुन स्वच्छ पुसुन घ्यावे. छतावरील खड्डे, टायर, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक वस्तू, कुंड्या खालची पेट्रीडिश, बादल्या, फ्रीजचे ट्रे, निरुपयोगी माठ स्वच्छ पुसून घ्यावेत. भांड्यात पाणी साचू देवू नये, झाडाच्या कुंड्या, प्राण्यांची पाणी पिण्याची भांडी यातील पाणी बदलत राहावे. वापराच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी. पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सोडावेत. मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे वापरावेत. डास होवू नये म्हणून डास अळीची पैदास रोखण्यात यावी.

डेंग्यूची लक्षणे : डेंग्यू हा एडिस इजिप्टाय या दूषित डासाच्या मादीने चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावतो व स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. डेंग्यूमध्ये एकाएकी तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, उलट्या होणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव, रक्त मिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे, नाकातून तोंडातून रक्त येणे इ. ही  लक्षणे असल्यास त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.

विजयसिंह शिंदे

जिल्हा हिवताप अधिकारी, बीड

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.