मंत्रीपद रक्षा खडसेंना,मात्र एकनाथ खडसे होणार ‘हेवीवेट’ ! गिरीश महाजनांच्या वर्चस्वाला देणार ‘टफ फाइट’ ?
मुंबई, दिनांक:9 जून,महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर समोर आलेले धक्कादायक निकाल यावर अनेक चर्चा सुरू असताना आज केंद्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सायंकाळी 7.30 वाजता पार पडणार आहेत. यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली इंडियाला बहुमत मिळालेले असल्याने पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा निवड होऊन केंद्रात सत्तास्थापन होणार आहे. नरेंद्र मोदींची पंतप्रधान होण्याची हॅट्रिक होण्यास फक्त काही तासांचा अवधी बाकी आहे.
दरम्यान, त्यामुळे निवडून आलेल्या काही खासदारांना आता मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. यात महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि रामदास आठवले यांना मंत्रीपदासाठी पीएमओ कार्यालयातून रात्री फोन आल्याची माहिती समोर आलेली आहे.
रक्षा खडसेंना मंत्रीपदाची लॉटरी
भाजप खासदार रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा 2 लाख 72 हजार मतांनी पराभव केला आहे. काल रात्री त्यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला असून आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात त्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाल्यास जळगाव जिल्ह्यातील हे चौथे मंत्रीपद असणार आहे. यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे महायुतीचे तीन कॅबिनेट मंत्री या जिल्ह्यात आहेत. तरीही मात्र जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देणारा किंवा रोजगार निर्मिती करू शकेल असा एकही मोठा प्रकल्प किंवा उद्योग जळगाव जिल्ह्यात आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा अनुशेष कसा भरून निघतो, याकडे जनतेच्या नजरा लागून आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातील बहुसंख्य असलेल्या लेवा पाटीदार समाजाची बहुसंख्य सुशिक्षित तरुण-तरुणी हे रोजगाराच्या शोधार्थ आजही पुणे, मुंबई, ठाणे आणि सुरत जिल्ह्यात स्थलांतरित होत आहे. त्यांना जिल्ह्यातच मोठा उद्योग प्रकल्प आणून इथेच रोजगाराची अपेक्षा आता खासदार रक्षा खडसेंकडून राहणार आहे. तसेच तापी नदीवरील प्रस्तावित मेगा रिचार्ज प्रकल्प देखील गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला असून त्याची फाईल शासन दरबारी प्रलंबितच आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातून हजारो लोक रोज विविध कामांसाठी मुंबईला जात असतात. मात्र भुसावळहुन मुंबईला नाशिक मार्गे जाण्यासाठी एकही विशेष एक्सप्रेस गाडी भुसावळ सारख्या मोठ्या जंक्शन वरून आजही उपलब्ध नाही. तसेच या मतदार संघातील प्रमुख शेती व्यवसाय असलेल्या केळीच्या प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे वॅगन मालवाहतूकीच्या भाड्या संदर्भातील प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान आता खासदार रक्षा खडसेंसमोर आहे. मात्र रक्षा खडसेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार की राज्यमंत्रीपद हे अजून निश्चित झालेले नाही. त्यांना महिला व बालकल्याण, रेल्वे, किंवा कृषी या खात्यांशी संबंधित मंत्रपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रक्षा खडसे त्यांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबत माध्यमांशी दिल्लीत बोलताना त्या अत्यंत भावूक झालेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या यशामागे त्यांचे सासरे एकनाथराव खडसे यांचे मोठे योगदान असून त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलेले आहे.
एकनाथराव खडसे ‘जैसे थे’ ?
यंदाच्या लोकसभेच्या भाजपने तिकीट जाहीर केलेल्या यादीत रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने सुरुवातीला त्यांना त्यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा, यावल, रावेर ,भुसावळ आणि बोदवड तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केलेला होता. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या जिल्ह्यातील काही खडसे विरोधक आमदार अचंबित झालेले होते. त्यांची अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार असल्याची त्यांची स्थिती झालेली होती. मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केल्याने पक्षादेश पाळावा लागणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितल्याने नंतर रक्षा खडसेंना होणारा विरोध मावळला आणि सर्वांनी रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय भूमिका बजावली होती. तर दुसरीकडे त्यांचे सासरे हे गेल्या दोन महिन्यांपासून ते भाजपमध्ये येण्यासाठी आतुर झालेले असून अद्यापावेतो व त्यांचा भाजप प्रवेश रखडलेलाच आहे. त्यांच्यासाठी भाजपच्या पक्ष प्रवेशाची दारे न उघडण्यामागे जिल्ह्यातूनच काही नेत्यांचा विरोध असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले होते. मात्र आता काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी त्यांना आता भाजप प्रवेशाची घाई नसल्याचे सांगितल्याने आणि आता रक्षा खडसेंना केंद्रात मंत्रीपद मिळत असल्याने एकनाथराव खडसे हे मंत्रीपदाची सूत्रे सांभाळण्यासाठी ‘जैसे थे’ परिस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे.
खडसे-महाजन सुप्त संघर्ष वाढणार ?
पूर्वाश्रमीचे भाजपचे जेष्ठ नेते राहिलेले एकनाथराव खडसे मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर अनेकदा कडाडून टीका केलेली आहे. त्यातूनच एकनाथराव खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात असलेलं राजकीय वैर अनेकदा आरोप-प्रत्यारोपातून समोर आलेलं आहे. आता रक्षा खडसेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने अप्रत्यक्षपणे एकनाथराव खडसे यांची ताकद वाढणार आहे. एकनाथ खडसेंनी यावेळी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडलेली आहे.तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना प्रचारार्थ कामाला लावून पडद्यामागून रक्षा खडसेंचा प्रचार केलेला आहे. रक्षा खडसेंना नेहमीप्रमाणे याही वेळी मोठे मताधिक्य रावेर लोकसभा मतदारसंघातून मिळाल्याने आजही या मतदारसंघातील बहुसंख्य लेवा पाटीदार आणि गुर्जर समाज हा एकनाथ खडसेंच्या पाठीशी असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेले आहे. आणि भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, रावेर-यावल, भुसावळ, मुक्ताईनगर जामनेर आणि मलकापूर या विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार निवडून येण्यासाठी बहुसंख्य लेवा पाटीदार आणि गुर्जर समाजाला आपल्या बाजूने खेचण्यासाठी भाजपने रक्षा खडसेंना मंत्रिपद दिल्याची व्यूहरचना आणि समीकरणं दिसून येत आहे. मात्र आगामी काळात रक्षा खडसेंचे मंत्रिपदाची सूत्रे ही एक प्रकारे एकनाथराव खडसेंच्या हातात राहणार असल्याने त्यांना आता पुन्हा हत्तीचे बळ प्राप्त झालेले असून ते आता पुन्हा भाजपमध्ये नसताना सुद्धा ‘हेवीवेट लिडर‘ झालेले आहेत. ते आता गिरीश महाजन यांना जिल्ह्यात ‘टफ फाईट‘ देण्यास सज्ज होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात मंत्री गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांच्याशी जुळवून घेतात की ? , त्यांचे वर्चस्व कायम राहण्यासाठी खडसेंना शह देतच राहणार ? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. रक्षा खडसेंच्या मंत्रिपदामुळे आता चाळीसगावचे आमदार आणि एकनाथराव खडसेंचे कट्टर राजकीय वैरी मंगेश चव्हाण यांची सुद्धा आता गोची होण्याची शक्यता आहे.