महाराष्ट्रमुंबईराजकीयसंपादकीय

इलेक्शन फिवर – फोडाफोडीचे सत्ताकारण ते आता पाडापाडीचे राजकारण ! अतृप्त बंडखोरांचा स्फोटक झंझावात गाजणार

विरोधी उमेदवारापेक्षा बंडखोरांची भीती

मुंबई, दि-९ मार्च, संपूर्ण राज्यभर राजकारणी आणि जनतेमध्ये लोकसभेचा ‘इलेक्शन फीवर’ संचारलेला असून रोज काहीतरी नवीन राजकीय बातमी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आसुसलेली असते.
तूर्तास अजून तरी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली नसताना पुढील महिन्यात होणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय नेते, कार्यकर्ते ,पत्रकार आणि लोकशाहीवर प्रेम करणारी जनता, नवमतदार यांच्यात निवडणुकीचा प्रचंड मोठा उत्साह संचारलेला दिसून येत आहे. जश्या जशा निवडणुका जवळ येतील तसातसा हा उत्साह आणखी शिगेला पोहोचेल यात शंकाच नाही. याला कारणही तसेच असून गेल्या दोन वर्षांपासून देशात कुठेही झाले नसेल एवढे राजकीय भूकंप तथा उलथापालथी महाराष्ट्रात झालेल्या आहेत.त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेलं असून अनेक राजकीय पक्षांचे आपल्याच पक्ष किंवा मित्रपक्षातील वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांवर असलेला विश्वास डळमळीत झालेला आहे. यामुळे विविध पक्षाचे कार्यकर्ते हे संभ्रमात असून आपला नेता कोणत्या क्षणी कोणत्या पक्षात पक्षप्रवेश करेल याची कोणालाही कल्पना करता येत नाही.अगदी रात्री सोबत असलेला नेता सकाळी उठून अनपेक्षितपणे दुसऱ्याच पक्षात धक्कादायकरित्या प्रवेश करत असल्याच्या घटना नेहमी घडताना दिसत आहे. कारण पूर्वी विशिष्ट विचारधारेवर विश्वास ठेवणारे आणि पक्षनिष्ठा बाळगणारे एकनिष्ठ राजकीय नेते व कार्यकर्ते होते असे सांगितले जाते.मात्र गेल्या तीन वर्षात राज्याची राजकीय परिस्थिती ही फोडाफोडीच्या राजकारणाकडून सत्ताकारणाकडे वळलेली दिसून येत असून राज्यात घडलेलं सत्तांतर आणि सत्तेत सहभागी होणे या अनपेक्षित घडलेल्या घटनांवरून इतर पक्षात कोणी नेता सत्तेसाठी जाणार नाही याचीही कोणतीच ‘गॅरंटी’ कोणीच देऊ शकत नाही.राज्यातील बहुतेक राजकारणी आपल्या सोयीनुसार फक्त सत्तेत सहभागी होण्यासाठीच राजकारण करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
खासदारांची तिकीट कापण्याचा आनंद वेगळाच
संभाव्य लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरूच असून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करून जागा वाटप करण्या संदर्भात रोज काही ना काही चर्चासत्रे, खलबतं आणि काथ्याकूट सुरूच आहेत. यातून प्रत्येक राजकीय पक्षांकडून त्यांच्या काही विद्यमान खासदारांची तिकडे कापली जाण्याची शक्यता असल्याची रंजक बातमी अधून मधून समोर येत असते. त्यामुळे जनतेचे खूप मनोरंजन होत असते. विद्यमान खासदाराचे टिकीट कापली जाणारी बातमी ऐकून लोकांना हायसे वाटून ‘ना नफा ना तोटा’ मात्र एक वेगळाच आनंद होत असतो.
दरम्यान, जोपर्यंत भाजप किंवा महायुतीच्या उमेदवारांचे तिकीट वाटप जाहीर होत नाहीत, तोपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचेही तिकीट वाटप होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक जण राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन तसेच टीव्हीवर दाखवले जाणारे निवडणुक निकालाची विविध सर्वेक्षणे यांचा अभ्यास करून आपली सोयीनुसार राजकीय दिशा ठरविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपानंतर आणि उमेदवार निश्चिती जाहीर झाल्यानंतर नाराज झालेले अतृप्त आत्मे हे झोपेतून खडबडून जागे होऊन बंडखोरीला बळ देतात.निवडणूकीत बंडखोरांची आव्हाने ही प्रत्येक उमेदवाराला घाम फोडतात. कारण बंडखोरचं सर्व मनसुब्यांवर पाणी फेरण्याच काम आणि मार्गात काटे पेरण्याच काम यशस्वीपणे पार पाडतात.
सध्याची स्फोटक राजकीय परिस्थिती पाहता ज्या विद्यमान खासदारांची टिकिटे कापली जातील ते खासदार नवीन उमेदवाराला पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरून किंवा बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढून नव्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात. कारण पूर्वीपेक्षा आताचे बंडखोरांचे आव्हान हे खूप कठीण असणार आहेत.शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही नीती पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.त्यामुळे राजकारणात मोठी जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे. राज्यातील सत्तेतून अनपेक्षीतरीत्या रात्रीतून सत्तेबाहेर फेकले गेलेले राजकीय नेते त्यांचा ‘सूड’ घेण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून टपून बसलेले असून ते योग्य क्षणाची वाट बघत होते. त्यांच्यासाठी ही ‘सुवर्णसंधी’ असून ते ती नक्कीच दडवणार नाहीत यात मुळीच शंका नाही. म्हणजेच येणारी निवडणूक ही लक्षवेधी ठरणार असून पाडापाडीच्या राजकारणासाठीच जास्त लक्षात राहणार यात शंका नाही. त्यासोबतच पैशांचा वारेमाप प्रचंड वापर यावेळी निवडणुकीत दिसू शकतो. मात्र पाडापाडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल हे भल्या भल्या निवडणूक सर्व्हेक्षणाचे अंदाज फोल ठरवतील हे मात्र नक्की.
मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध उपोषणे करून तसेच मुंबईकडे भव्य मोर्चा काढून वातावरण टाइट केले होते.
या आंदोलनाचा येणाऱ्या निवडणुकांवर नक्कीच मोठा प्रभाव पडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी खास करून भाजपविषयी फसवणूकीची भावना असून ते खास करून मराठवाड्यात प्रत्येक गावातून लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. असे झाल्यास हे उमेदवार नक्कीच महायुतीच्या प्रस्थापित उमेदवारांचे गणित बिघडवतील यात शंका नाही.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button