3% घटस्फोट हे ट्रॅफिकजाममुळे होतात- अमृता फडणवीस यांचा दावा

मुंबई – राज्यातील विविध विषयांवर अमृता फडणवीस नेहमी आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. आजही त्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता एक नवीन दावा केलेला आहे की, मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकजाममुळे होत आहे.
फडणवीस यांच्या दाव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय. मात्र अमृता फडणवीसांनी पुरावा म्हणून सर्वेक्षणाचा दाखला दिलेला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की तुम्हाला माहिती आहे की मी सर्व्हे एजन्सी तर मुळीच नाही, मात्र एका सर्व्हे एजन्सी मंकी डॉट कॉम यांनी मुंबईतील लोकांचे घटस्फोटाबाबतचे सर्वेक्षण केलं होतं. तो घटस्फोटाबाबतचा डाटा मी त्यांना मागितल्यानंतर त्यांनी मला दिला होता, त्यात 3% लोकं हे घटस्फोट घेतात असा दावा करण्यात आला होता. त्यात त्याची अनेक कारणं होती आणि त्यातील ट्रॅफिकजाम हे एक कारण होते. त्यांच्या घरगुती आयुष्यावर परिणाम होत होता. 3 ते 5 तास त्यांचा वेळ ट्रॅफिकमध्ये जात होता. त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे घटस्फोट झाले, असा दावा फडणवीस यांनी केलेला आहे.