महाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विलंब!आधी “कोंबडी की अंडे” या उक्तीप्रमाणे अध्यक्षांची माथापच्ची ! म्हणून “तारीख पे तारीख”

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विलंब

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे सूचित केल्याल्यानंतर, आता या प्रकरणी पुढच्या एक ते दोन आठवड्यात निकाल लागेल की काय ? अशी चर्चा सुरु झालेली. पण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर यावर्षी तरी निकाल लागण्याची शक्यता धूसर दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकर यांनी काल तातडीने सुनावणी बोलावली. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र या प्रकरणी पुन्हा “तारीख पे तारीख” देत आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
   या सुनावणीनंतर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झालीय. ती म्हणजे या 16 शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणं कठीण आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी डिसेंबरपर्यंत येणं अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच विधानसभा अध्यक्षांसाठी हा निकाल देण म्हणजे “आधी कोंबडी की अंडे ” या युक्ती प्रमाणे प्रश्नार्थक मंथन करण्यासारखा झाला आहे.

निकालाला विलंब होण्याचं कारण काय?

दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी करणं, आमदारांची साक्ष नोंदवणं आणि उलट तपासणी करणं ही सर्व सुनावणीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणं कठीण आहे.

विधीमंडळाचं डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन देखील आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अधिवेशनात व्यस्त असतील. त्यापूर्वी प्रत्येक आमदाराला बोलावून त्यांची साक्ष नोंदवणं, त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या पक्षप्रमुखांना बोलावून त्यांचीसुद्धा साक्ष नोंदवणं, तसेच दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन, पुन्हा एकदा उलट तपासणी घेणं ही सर्व कारवाई विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कारवाईला कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर तातडीने निकाल जाहीर होणं कठीण आहे.

विधानसभा अध्यक्ष अहवाल सादर करणार
दोन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी आहे. या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली, आमदारांचे साक्ष कशाप्रकारे नोंदवण्यात आले, या विषयीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर करतील.
सुनावणीत काय-काय घडलं?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी. कारण या सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्वांची सुनावणी एकत्र घ्यावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. पण त्यांच्या या युक्तिवादावर ठाकरे गटाचे वकील अनील साखरे यांनी आक्षेप घेतला. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी नको, असं ते म्हणाले. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे आहेत आणि प्रत्येक याचिकेतील मुद्द्यांसाठी आमचे पुरावे देखील वेगवेगळे आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला.

पुढील सुनावणी कशी घेणार आहात ? 34 याचिकांचं वेळापत्रक कसं असेल ? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना विचारले. त्यावर अध्यक्षांनी सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सर्व वकिलांना सुचविणार आणि त्यावर सगळ्यांची मते घेणार आहे, असं सांगितलं. दरम्यान, सुनावणीआधी मुद्दे ठरवावे लागणार, असे अध्यक्षांनी म्हणताच ठाकरे गटातर्फे आक्षेप घेण्यात आला. कधीच असे झाले नाही? अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली.

पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणी दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button