500 च्या बोगस नोटांचं प्रमाण 100 टक्क्यांनी वाढलं | नोटबंदी फेल ? | RBI चा अहवाल सादर

The number of bogus 500 notes has increased by 100%
नवी दिल्ली दि: 29 देशात बोगस नोटांचं प्रमाण तब्बल 100 टक्क्यांनी वाढत असल्याचं आरबीआयच्या आजच्या अहवालातून याबद्दलची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून ती अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक आहे. २०२१-२२ मध्ये बोगस नोटांचं प्रमाण वाढलं आहे. ५०० रुपयांच्या बोगस नोटांचं प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढलं आहे. तर २००० रुपयांच्या नोटांचं प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढलं आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंत बाजारात असलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचं प्रमाण ८७.१ टक्के होतं. ३१ मार्च २०२१ पर्यंत हे प्रमाण ८५.७ टक्के इतकं होतं. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५०० रुपयांचं प्रमाण सर्वाधिक होतं. हे प्रमाण ३४.९ टक्के होतं. यानंतर १० रुपयांच्या नोटेचा नंबर लागतो. बाजारात असलेल्या एकूण चलनांत १० रुपयांच्या नोटांचं प्रमाण २१.३ टक्के आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १०, २०, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नकली नोटांचं प्रमाण अनुक्रमे १६.४ टक्के, १६.५ टक्के, ११.७ टक्के, १०१.९ टक्के आणि ५४.६ टक्के इतकं वाढलं आहे. तर ५० रुपयांच्या बोगस नोटांचं प्रमाण २८.७ टक्क्यांनी, तर १०० रुपयांच्या बोगस नोटा १६.७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
बँकांच्या मशीन्स फेल ?
देशात एवढ्या प्रचंड प्रमाणावर बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण समोर आल्यानंतर बँकांमध्ये नोटा चेकींग करणाऱ्या मशीन फेल झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
चलनात असलेल्या बोगस नोटांचं प्रमाण वाढल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केललं आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आरबीआयच्या अहवालानंतर मोदी सरकारला लक्ष्य केलं. ‘भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला हेच नोटबंदीचं एकमेव दुर्दैवी यश’, अशा शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे.