आरोग्य

AICTS पुणे येथे झाले पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), पुणे हे भारतीय सेना दलाचे 600 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. हे कार्डिओ थोरॅसिक शस्त्रक्रियांचे भारतामधील सर्वात जुन्या केंद्रांपैकी एक आहे. 30 मे 2022 रोजी पहिले बालरोग हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, तेव्हा एआयसीटीएस ने आपल्या गौरवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याच्या मोहम्मद फरदीन मन्सुरी नावाच्या 14 वर्षांच्या किशोर वयीन मुलाला धाप लागणे आणि थकवा येणे या तक्रारीसाठी दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात पहिल्यांदा दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टर आणि त्याच्या पालकांना अशी शंका होती, की त्याला एखादा संसर्ग झाला असावा आणि एक दोन आठवड्यांत तो बरा होईल. मात्र त्याचं विधिलिखित काही वेगळंच होतं. कोणाला कल्पनाही नव्हती की त्या मुलाला गंभीर स्वरूपाचा हृदय रोग झाला आहे, ज्यामुळे त्याच्या हृदयाचा विस्तार आणि कार्यक्षमता कमी होत आहे.

मुलाच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही आणि हृदयाच्या कामामधील विफलतेमुळे त्याला वारंवार अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. कुठल्याही उपचाराविना त्या तरुण मुलापासून जीवन दूर जाताना दिसत होतं. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याला 18 महिन्यांपूर्वी स्वीकारण्यात आले आणि त्याचा यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्राप्तकर्त्यांच्या यादीत समावेश करण्यात आला.

या तरुण मुलाचं वजन, रक्त गटाशी जुळणारं आणि प्रत्यारोपणासाठी सुरक्षितपणे आणता येईल एवढ्या अंतरावर हृदय उपलब्ध होणं हे या विशिष्ट प्रकरणामधलं आव्हान होतं. दीर्घ प्रतीक्षेनंतर 30 मे 22 रोजी तो  दिवस उजाडला, जेव्हा एआयसीटीएस च्या पथकाला संभाव्य हृदय दात्यासंबंधी सूचना मिळाली, ही एक 14 वर्षांची मुलगी होती, आणि रस्ते अपघातात तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली होती. तिचं वजन आणि रक्तगट प्रतीक्षा करत असलेल्या रुग्णाचं वजन आणि रक्त गटाशी जुळत होतं. क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून सह्याद्री रुग्णालय, पुणे इथून दात्याचं हृदय आणण्यासाठी समन्वय साधण्यात आला.

रात्री उशीरा सूचना मिळाल्यावर लगेच एआयसीटीएस ने हृदयाच्या प्राप्तीसाठी मुल्यांकनाची प्रक्रिया तत्काळ सुरु केली, सकाळी 10 ही वेळ निश्चित केली. हृदय प्राप्त करण्यासाठी ठरल्या वेळेला एआयसीटीएस चं पथक रुग्णालयात पोहोचलं. यकृत आणि मूत्रपिंडानंतर हृदय काढण्यात आलं आणि सुरक्षितपणे एआयसीटीएस मध्ये आणलं गेलं.

दान करण्यात आलेलं हृदय घेऊन येण्यासाठी मोकळा रस्ता मिळावा यासाठी सैन्य दलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या पोलीस पथकाने पुणे वाहतुक पोलिसांशी समन्वय साधला आणि केवळ 11मिनिटांमध्ये हे हृदय एआयसीटीएस, पुणे इथे आणलं गेलं.

एआयसीटीएस मध्ये त्यापूर्वीच लाभार्थी रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं गेलं होतं आणि त्याचं हृदय काढण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. त्यानंतर संपूर्ण पथकानं अत्यंत वेगाने काम केलं आणि ठरलेल्या वेळात हृदयाचं प्रत्यारोपण पूर्ण झालं. तरी, या कामाचा काही भागच पूर्ण झाला होता. प्रत्यारोपण करण्यात आलेल्या हृदयाला नव्या शरीरात आपली गती आणि प्रक्रिया सुरु करायला वेळ लागत होता. त्यामुळे रुग्णावर ईसीएमओ (Extra Corporeal Membrane Oxygenation) हा शस्त्रक्रिया पश्चात उपचार सुरु करण्यात आला. या मुलाला त्याचं निरोगी बालपण परत देण्यासाठी सर्वसमावेशक बहु-अनुशासानात्मक सांघिक कार्याची आवश्यकता आहे.

1960 च्या दशकात अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतल्या प्रयोगशाळांमध्ये सुरु झाल्यापासून हृदय विफलतेवरील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने मोठा पल्ला गाठला आहे. समाजामध्ये प्रत्यारोपणाचं महत्त्व समजून घेणं आणि ते स्वीकारणं याची आता कुठे सुरुवात झाली आहे. समाजाच्या स्वीकृतीमुळे हृदय दात्यांची उपलब्धता वाढत आहे. या स्वीकृतीला अजूनही जागतिक पातळीवर सामाजिक संस्कार आणि धारणांवर मात करायची आहे.

यशस्वी हृदय प्रत्यारोपण हे अनेक वर्षाचं प्रशिक्षण, तंत्रज्ञानामधील सुधारणा आणि अनेक वेळा सराव करून रूळलेली मानकं याचं एकत्रित फलित आहे. हा उपचार त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या सहज आणि व्यापकपणे आवाक्यात यावा, यासाठी एआयसीटीएस ने हा खडतर प्रवास यशस्वीपणे सुरु केला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.