
Eknath Shinde | आठ अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढला ? राज्यपालांना ईमेल द्वारे पाठविले पत्र
मुंबई- भाजप नेते माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच राजभवनात दाखल झालेले होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार हे अल्पमतात असल्याचा दावा करून बहुमत चाचणी घेण्याची विनंती केलेली आहे. यामुळे आता राजकीय घडामोडींना तुफान वेग आलेला असून एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचे काल सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याने ‘मविआ’ सरकार अल्पमतात आल्याची चिन्हे दिसून येत आहे. त्याचवेळी दुसरीकडे आठ अपक्ष आमदारांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी घेण्यासाठी इमेल करण्यात आला आहे, अशी माहिती ‘ANI’ वृत्तसंस्थेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे.
विरोधकांकडून बहुमत चाचण्यांसारख्या मागण्या जर करण्यात आल्या, तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं शिवसेनेकडून आजच जाहीर करण्यात आलेलं आहे.
आतापर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे फक्त बैठकांवर बैठका घेऊन आणी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन गृहमंत्री अमित शाह आणी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचेसह सत्तेचे डावपेच आखण्यात मग्न होते. तसेच ते माध्यमांपासूनही दूर राहून मौन बाळगून होते. कालच मुंबईतील त्यांच्या सागर बंगल्यावर महाराष्ट्र भाजपची कोअर कमिटीची बैठक झालेली होती.तरीही ते मौन बाळगून सर्व राजकीय परीस्थिती वर बारीक लक्ष ठेवून होते.मात्र आता त्यांनी दोन्ही पाऊलं पुढे टाकलेली असून त्यांच्या प्रत्येक कृती व निर्णयांकडे संपूर्ण महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे. त्यांनी आता प्रत्यक्ष जोरदार हालचाली सुरू केल्याने महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे संकेत दिसू लागलेले आहे.
दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे आठ अपक्ष आमदार उद्या मुंबईत येणार असून ते राजभवनात राज्यपाल यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जेव्हा सत्तेत सहभागी असलेले नोंदणीकृत घटकपक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपाल यांना देतात तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाशी चर्चा करून त्यांना सभागृहात बहुमत चाचणी घेण्याचे पत्र देतात. असे झाल्यास महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या राज्यपाल नेमके काय निर्णय घेतात याकडे सर्व सत्ताधारी महाविकास आघाडीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. उद्या राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असून तसे झाल्यास महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करावेच लागणार आहे.तसेच गुवाहाटी येथील हॉटेल मध्ये असलेले एकनाथ शिंदे गटाच्या सर्व पर्यटनप्रेमी आमदारांनी आता बॅगा भरल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र ते उद्या कुठे जाणार याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही.