Eknath Shinde | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ | शपथविधी आधी नाट्यमय घडामोडी

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन तासांपूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित करून महाराष्ट्राच्या जनतेला एक मोठा धक्का दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती तसेच ते स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आता काही वेळापूर्वी ट्वीट करून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती दिलेली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांची मनधरणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करून त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास राजी केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नाट्यमय घडामोडीत नवा ट्विस्ट आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस हे देखील आता राजभवनात शपथ घेणार आहेत. आता पुढे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणखी काय नाट्यमय घडामोडी घडतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.