
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंसह गेलेले बंडखोर आमदार जर महाराष्ट्रात असते तर,मी नक्किच काहीतरी करू शकलो असतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे प्रतिनिधी असले तरी ते मूळचे साताऱ्याचे आहेत, ही सातारा जिल्ह्याला लागलेली लॉटरी आहे,असेही पवार यांनी म्हटलेंलं आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, “शिवसेनेत बंड झालं हे काही पहिल्यांदाच झालं नाही, जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले, ते नंतर पराभूत झाले. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे पराभूत झाले.1980साली माझ्या नेतृत्वाखाली निव़डणूक झाल्यानंतर 67 आमदार निवडून आले होते. मी काही दिवसांसाठी राज्याच्या बाहेर गेलो आणि सगळे सोडून गेले, फक्त सहा आमदार माझ्यासोबत राहिले. मग नंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेले जवळपास सर्वजण पराभूत झाले. उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झालं.
जे आमदार सेना सोडून गेले त्या बंडखोर आमदारांची नेतृत्व बदलाची मागणी असावी असं सांगत शरद पवार म्हणाले की, कोणतीही संधी असो ती स्वीकारायची असते याचं उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलं. शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोन नंबरची जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असं काही दिसत नाही, त्यांचा चेहराच सांगत होता. पण देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते त्यामुळे एकदा भाजप पक्षश्रेष्ठी किंवा नागपूरचा आदेश आल्यानंतर तो स्वीकारणे हे त्यांचे संस्कार आहेत. शिंदे मुख्यमंत्री होतील याची कुणालाच कल्पना नव्हती, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो त्यावेळी शंकरराव चव्हाण मंत्री होते, त्या आधी त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रीपद स्वीकारलं.
हेही वाचा : जाता जाता उद्धव ठाकरेंनी लगावले चार “मास्टर स्ट्रोक”, दीर्घकाळ प्रलंबित गुंतागुंतीच्या विषयांना दिली मंजूरी
40 आमदार राज्याबाहेर नेणं सोपं नाही
एकनाथ शिंदेंनी सेनेच्या आमदारांना प्रभावित केलं, जवळपास 40 आमदार बाहेर नेले,ते सोप नव्हतं, हेच त्यांचं मोठं यश आहे. आमदारांना बाहेर नेणं हे प्लॅनिंग आधीपासूनच होतं, ते काही एका दिवसात होणं शक्य नाही,असेही शरद पवार म्हणाले.
ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेमुळे राज्यातील सत्ता बदलत आहेत. या एजन्सीचा उपयोग हा राजकीयदृष्ट्या विरूद्ध विचारांच्या लोकांविरोधात केला जातोय असं शरद पवार म्हणाले. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचं की नाही याचा विचार अद्याप झाला नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.