जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार – CM एकनाथ शिंदे

जळगाव, दि. 13/08/2024:- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकासकामांना खीळ न बसू देता ती अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन यावेळी झाले.

            या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री आ.चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. लता सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलतांना‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमित जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे.  संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके  लागतात. बहिणींच्या हाताचे  हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही जमा होतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन – प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासनस्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार आहे. अशा‌ शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत‌. यात तरूणांना महिन्याला १० हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. लेक लाडकी योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही यांची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
महिलांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. महिलांना एसटीतील ५० टक्के सवलतीमुळे एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. महिलांच्या हातात पैसे पडल्यामुळे तो त्याचा सदुपयोग करतात‌ त्यामुळेच महिलांना बळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुलींकरिता शासनाने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
  जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देण्याचे काम शासन करणार आहे. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, गरीब, युवा, शेतकरी व महिलांसाठी हितकारक ठरणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  महाराष्ट्राचे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची चणचण नाही. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे‌. राज्यातील विकासकामांवर परिणाम होऊ न देता ही योजना राबविण्यात येत आहे. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार आहे. या योजनेमुळे वर्षाला ४६ हजार कोटी खर्च होणार आहे. त्यातून बाजारात पैसा येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीजबिल सवलतीची बळीराजा योजना आणण्यात आली आहे‌.असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ५ लाख ९ हजार एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. यातून महिन्याला ८८ कोटी रूपये बहिणींना देण्यात येणार आहेत. मागील अडीच वर्षांत सर्वात जास्त योजना महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक निधी अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रभातसंघ, झेप महिला प्रभात संघ,स्त्री शक्ती महिला प्रभात संघ या महिला बचतगटांना प्रत्येकी 24 लाख 60 हजार रूपयांच्या अनुदानाचा धनादेशांचे वितरण करण्यात आले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button