पुणे महापालिकेत 25 तृतीयपंथी सुरक्षारक्षकांची नियुक्ती, पुणे महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय
पुणे दि-14 : पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाने
तृतीयपंथी सदस्यांचा समावेश करून सर्व समावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.सर्वत्र वाखाणल्या गेलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यातील एक सुरक्षा रक्षक म्हणजे ट्रान्सजेंडर राजू, ज्यांना सान्वी डोईफोडे म्हणूनही ओळखले जाते, संत साहित्याचे अभ्यासक आणि एक प्रतिभावान किर्तनकार असलेले आज सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत रुजू झालेले आहेत. पुणे महापालिका भवनाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत सेवा करण्याचा मानस राजू यांनी व्यक्त केला.
राजू डोईफोडे यांनी त्यांचा किशोर वयापासूनचा अनुभव
शेअर केला, त्यांनी असे सांगितले की, वयाच्या दहाव्या
वर्षापर्यंत त्यांचे जीवन सामान्य वाटत होते, जेव्हा त्यांना हे जाणवू लागले की तो पुरूषांपेक्षा कसा तरी वेगळा आहे. अभ्यास आणि खेळातून स्वतःचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करूनही, त्याच्या चालण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे त्याला भेदभाव आणि टोमणेबाजीचा सामना करावा लागला. मात्र, त्यांची कीर्तनाची आवड कायम होती. आळंदी येथील एका संस्थेत कितीही अडथळे आले तरी कीर्तनाची आवड जोपासण्याचा निर्धार केला. त्यानंतर राजूने आपल्या कुटुंबासमोर आपले अनुभव आणि आपली ओळख सांगण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुर्दैवाने, त्याला त्याचे कुटुंब आणि समाज दोन्हीकडून नकारात्मकतेचा सामना करावा लागला. तो घर सोडून दोन मित्रांच्या आधारावर विसंबून राहिला.रोजगार शोधण्याचे त्याचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, त्याला सतत नाकारले गेले, अखेरीस त्याने जगण्यासाठी रस्त्यावर भीक मागण्याचा अवलंब केला. याच आव्हानात्मक काळात त्याने पुणे महानगरपालिकेकडून ट्रान्सजेंडर समुदायातील सुरक्षा रक्षकांची मागणी करणारी एक जाहिरात वर्तमानपत्रात बघितली.त्यांनी लगेच या पदासाठी अर्ज केला.तसेच सर्व प्रशासकीय कागदपत्रांच्या पूर्तता यशस्वीपणे पूर्ण केल्या.त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेतून सन्मानाने जगण्याची संधी मिळाल्याबद्दल राजूने आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. तथापि, कौटुंबिक आणि समाजाच्या स्वीकृतीच्या अभावामुळे त्याच्यासमोर चालू असलेल्या आव्हानांची त्याने कबुली दिली. तृतीयपंथी समाजाच्या प्रत्येक सदस्याला समाजाने आदरयुक्त स्वीकारून सन्मानाने जगण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन राजू यांनी केले.
पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी एका सभेत समाजातील सर्व समावेशकतेचे महत्त्व विशद केले होते.या बाबीला समर्थन देताना पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी तृतीयपंथी समाजाला सन्मानाने जगता यावे आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी तृतीयपंथी समाजाच्या सुरक्षारक्षकांच्या 25 जागा भरण्याच्या आकृतीबंधाला राज्य शासनाकडून परवानगी मिळवली. त्यानंतर जाहिरात काढण्यात आली.आणी तब्बल 33 तृतीयपंथीयांचे सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज दाखलही झाले.यापैकी आता पहिल्या टप्प्यात 10 जणांची नियुक्ती करण्यात आलेली असून बाकीच्या 15 जणांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेली आहे.