जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

रक्षा खडसेंचे खासदारकीसह मंत्रीपद धोक्यात ? एकनाथराव खडसेंच्या घराणेशाहीच्या राजकारणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याची शक्यता ?

मुक्ताईनगरच्या मतदारांनी खडसेंचा 'निकाल' लावला !

जळगाव दि-24/11/2024, काल संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या ऐतिहासिक महाविजयाने महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याने आधीच सन्नाटा पसरलेला असताना आता जळगाव जिल्ह्यातून मोठी खळबळजनक बातमी सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे. काल मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी एकनाथ खडसे यांचा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 23945 त्यांनी दणदणीत पराभाव केल्याने खडसे कुटुंबात मोठी खळबळ उडालेली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात केलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांचाही विचार करून मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे.तब्बल 30 वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केलेल्या एकनाथराव खडसेंना सलग दुसऱ्या पंचवार्षिक मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षाही यावेळी मतदारांनी जोरदार धक्का दिल्याने एकनाथराव खडसेंचा राजकीय प्रभाव व लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगर मध्येच असतानाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, तसेच नणंद रोहिणी खडसेंच्या दारूण पराभवावर सुद्धा कोणतेही भाष्य काल केलेलं नाही. कारण रोहिणी खडसेंचा पराभव हा थेट एकनाथ खडसेंचाच पराभव असल्याचे मानले जाते. याचाच अर्थ आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी खडसेंच्या कुटुंब कल्याणाच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणाचे ‘पानीपत‘ करून त्यांचा राजकीय ‘ निकाल ‘ लावून टाकलेला आहे. विशेष म्हणजे एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी प्रचाराच्या जाहीर सभा घेतल्या ते सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार हे मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी ते राष्ट्रवादीकडून लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केलेले होते. मात्र ऐनवेळी स्नुषा रक्षा खडसेंसाठी त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवून आणि भाजपात प्रवेश करत असल्याचे जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन शरद पवारांसह त्यांच्या राष्ट्रवादीला मोठ्या अडचणीत आणलेले होते. त्यामुळे रावेर लोकसभेत राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधायला खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्यानंतर रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून श्रीराम दयाराम पाटील या नवख्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत किंवा प्रचार त्यांनी केला नसल्याने त्याचे शल्य राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह मराठा समाजामध्ये पसरून एकनाथ खडसेंच्या कुटुंब कल्याणाच्या राजकारणाविषयी नाराजी वाढलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा उमेदवाराचा झालेला विश्वासघात आता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर तालुक्यातील मराठाबहुल गावांमधील मतदारांनी खडसेंच्या विरोधात मतदान करून त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. रावेर तालुक्यात येणाऱ्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांमधील आकडेवारी बघता आमदार चंद्रकांत पाटील यांना खूप मोठं मताधिक्य मिळालेले दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सुद्धा मुक्ताईनगर तालुक्यातील मतदारांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा दारुण पराभव केलेला होता. विशेष म्हणजे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरातून निवडणूक लढवून त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव केला होता.
रक्षा खडसेंचे खासदारकीसह मंत्रीपद धोक्यात ?

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या यादीत रक्षा खडसेंचे अनपेक्षितपणे नाव आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह अनेकांना मोठा धक्का बसलेला होता. त्यानंतर त्या विजयी होऊन मंत्री देखील झालेल्या आहेत. मात्र गेल्या आठवड्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी रावेर मतदार संघात जाहीर प्रचार सभा घेतलेली होती. यादरम्यान त्यांनी जळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी रावेर लोकसभा क्षेत्रातील स्थानिक राजकीय घडामोडींबाबत चर्चा सुद्धा केलेली होती. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे असलेल्या मंत्री पदाची सूत्रे एकनाथ खडसेंच्या जवळचे कार्यकर्ते हाताळत असल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते असलेल्या ठेकेदारांकडून करण्यात आलेली होती. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या आधी चौपदरीकरणासह राष्ट्रीय महामार्गाची मंजुरी मिळालेला बुरहानपुर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग हा रावेर व यावल  तालुक्यातील हल्ली अस्तित्वात असलेल्या ठिकाणीच रुंदीकरण करण्याची नागरिकांची मागणी असताना तो खडसेंच्या मनमानी कारभारामुळे मुक्ताईनगर तालुक्यातून वळविण्यात येणार असल्याची तक्रार भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केलेली होती. यात मुक्ताईनगर तालुक्यातील काही खडसे समर्थकांच्या शेतजमिनी या महामार्गाच्या आराखड्यात वळविण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याची चर्चा तेव्हा सुरू झालेली होती.त्यामुळे रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती, याबाबत आंदोलने देखील झालेली होती.
हल्ली अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत काही भाजपच्या नेत्यांच्या शेतजमिनी असल्याने तो महामार्ग हल्लीच्या महामार्गावर रुंदीकरण करूनच वाढवण्यात यावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केलेली आहे. मात्र यात मंत्री रक्षा खडसे यांची भूमिका वेगळी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे रक्षा खडसेंच्या मंत्री पदाची सूत्रे दुसरेच कोणीतरी हलवत असल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे रक्षा खडसेंवर आता राजकीय संकट उभं राहिलेलं असून त्यांची खासदारकी व मंत्रीपद काढून त्याऐवजी लेवा समाजातील भाजपच्या निष्ठावंत व्यक्तीला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे. त्यासाठी कालच्या निकालातून रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली भरघोस मते विचारात घेतली जात आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडी बघता एक प्रकारे आता एकनाथ खडसेंचा राजकीय करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची चर्चा सुरू झालेली असून येणाऱ्या कालखंडात खडसेंचे घराणेशाहीचे राजकारण संपवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रक्षा खडसेंची खासदारकी गेल्यास रावेर लोकसभा मतदारसंघासाठी डॉ केतकी उल्हास पाटील आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या जेष्ठ कन्या भावीनी राम पाटील त्यांचे नाव भाजपकडून आता चर्चेत आलेले असून त्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांच्या उमेदवारी संदर्भात थेट गुजरात मधूनच फिल्डींग लावली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांचे नाव रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आलेले होते. केंद्रीय कॅबिनेट मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचे मूळ गाव हे भुसावळ तालुक्यातील सुसरी हे असून ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. या सर्व घडणाऱ्या गुप्ता घडामोडींची कदाचित मंत्री रक्षा खडसेंना कुणकुण लागल्यानेच त्यांनी विधानसभा निवडणूक निकालाबाबत अजून तरी कोणतेही भाष्य केलेले दिसून येत नसल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात आता काय घडामोडी घडतात ? याकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button