आ. एकनाथराव खडसेंचा ‘तो’ राजीनामा ‘गहाळ’ ? म्हणून भाजपमधील ‘ घुसखोरी ‘ टळली ? राष्ट्रवादी ” हायजॅक ” ?
खडसे विरूद्ध राज्यभाजप नेते सामना ' टाय ' ?
जळगाव दि- ०५/०९/२०२४ ,आ.एकनाथराव खडसे जिंकले…होय खरच जिंकले. आता रोहिणी खेवलकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आ.खडसे पुढच्या काही दिवसांत सक्रिय झालेले असतील. “खडसेंचा भाजपप्रवेश” या नाट्यप्रयोगात प्रत्यक्ष सहभागी न होता मंत्री गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे मारलेला ‘ मंत्र ‘ सुद्धा परिणामकारक वरचढ ठरून आ. खडसेंच्या भाजपप्रवेशाला ‘स्टे’ आणून ‘सहस्थगिती’ लावल्याच बोललं जात आहे. एकनाथराव खडसेंनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, विनोद तावडे आणि रक्षाताईंच्या उपस्थितीत गुपचुप झालेल्या कथित भाजप प्रवेश एक दंतकथा बनलेला आहे. एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर, ते कथित राजीनामापत्र जयंत पाटलांच्या टेबलावर मंजूर होण्याआधीच ते पोहचू न देण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयातील संबंधित खडसेविरोधी कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याच बोललं जात आहे. एकनाथराव खडसेंचा तो राजीनामा आता ” गहाळ ” झाल्याचे समोर आलेलं आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंच्या लांबलेल्या भाजप प्रवेशासाठी ते राष्ट्रवादीचे कार्यालयीन कर्मचारी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. असो, पण खडसे मात्र भाजपमध्ये जाताजाता राहिले असले तरी खडसेंची “कायमचा भाजपप्रवेश ” न करण्याची सुप्त व्यूहरचना आता यशस्वी झाल्याच बोललं जात आहे.कारण एप्रिल महिन्यात खडसेंनी राजीनामा देऊन मी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर करून देखील जिल्ह्यातील किंवा राज्यातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही. जेष्ठ नेते असूनही भाजप पक्षश्रेष्ठींनी अनेक महिने पक्षप्रवेशासाठी ताटकळत ठेवूनही खडसे भाजप प्रवेशासाठी आशावादी कसे राहीले ?हा त्यांना स्वतःचा अवमान वाटला नाही का ? त्यांचा स्वाभिमान वेळीच जागा का झाला नाही ? भाजपमध्ये जबरदस्तीने घुसखोरी करण्याचा खडसेंचा इरादा का होता ? असे अनेक प्रश्न सातत्याने समर्थक कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागल्याने याचे गूढ उकलणे खडसेंना क्रमप्राप्त आहे.
मंत्री रक्षाताईंचं त्या घटनेवर आजवर मौन का ?
विशेष म्हणजे आ.खडसेंनी नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या दिवशी माध्यमांसमोर केलेल्या दाव्यानुसार रक्षा खडसेंच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या ‘त्या’ कथित भाजप प्रवेशाबाबत रक्षा खडसेंनी आजपर्यंत कधीच ना भाष्य केले, ना कोणता खुलासा केला, उलट त्यांनी “नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा विषय त्यांनाच विचारा ” म्हणून प्रत्येक वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची टोलवाटोलवी केलेली आहे.
आ. खडसेंनी राष्ट्रवादीला दगा दिला का ?
आ.खडसेंनी लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याचा ‘आव’ आणून नंतर तब्येत बिघडली म्हणून ऐनवेळी रावेर लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला कुटुंबाच्या सोयीची भूमिका घेऊन पक्षाला दगा दिल्याचा आरोप माजी मंत्री सतिशअण्णा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खा.सुप्रिया सुळेंच्या समोर जाहीरपणे केला होता. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात स्नुषा रक्षाताई खडसे यांचे रावेर लोकसभेचे तिकीट पदरात पाळून, रक्षाताईंचा पडद्यामागून प्रचार करुन त्यांना निवडून आणण्यात खडसेंचा खारीचा वाटा नसला तरी राष्ट्रवादीला दिलेल्या ‘चॉकलेटचा‘ वाटा नक्कीच होता.
काही दिवसांपूर्वी आ. खडसेंनी माझ्या भाजपप्रवेशाला ‘खालच्या’ पातळीवर विरोध असल्याने आपला भाजप प्रवेश रखडलेला असल्याचे सांगितले होते. परंतु भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी मात्र आधी खडसेंनी ” राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा दाखवावा “ त्यानंतरच भाजपात प्रवेश घ्यावा अशी थेट भूमिका दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे घेतल्याने खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याचे बोलले जात आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मात्र आ.खडसेंनी ‘हायजॅक‘ केल्याचे स्पष्ट झालेलं आहे. याचं कारण म्हणजे आ. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे एप्रिल महिन्यात जाहिर केले खरे, मात्र ते दिलेलं कथित राजीनामापत्र त्यांच्या त्या कथित ‘सीडी’ प्रमाणे ना प्रसारमाध्यमांना दाखवले ना, ना कधी ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. आ. एकनाथराव खडसेंच्या या संशयास्पद राजीनामा नाट्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलेल्या राजीनाम्याचे गूढ वाढत जाऊन पत्रकार आणि राजकारण्यांचा संशय गडद होत गेला. प्रसिद्ध म्हणं ‘दाल मे कुछ काला‘ असल्यासारखा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये कायम वाढतच गेला, कारण बहुतांश वेळा जेष्ठ राजकारणी नेते त्यांनी एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर करतात. इथे मात्र खडसेंची राजीनामा देण्याची कृती संभ्रमात टाकणारी होती. विशेष म्हणजे खडसेंनी राजीनामा दिल्याचे ना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आजपर्यंत माहिती आहे ,ना सुप्रिया सुळेंना याची कल्पना आहे. सर्वांनी यावर कायम चुप्पी साधलेली आहे. त्यामुळे ते कथित राजीनामापत्र एक गूढ बनलेले आहे. या राजीनामा नाट्यात सर्वात लक्षवेधी खुलासा काही महिन्यांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर केला होता. त्यांनी असं म्हटलेलं होतं की, ” एकनाथराव खडसेंना काही वैयक्तिक कायदेशीर अडचणी असून, त्यामुळे ते हतबल झालेले आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी ते भाजपात जात आहे “ त्यामुळे आता स्नुषा रक्षा खडसे या खासदार म्हणून निवडून येऊन केंद्रीय मंत्री झाल्याने आ. खडसेंच्या “त्या” अडचणी दूर झाल्याचे बोलले जात आहे.
रोहिणी खेवलकरांचे राजकीय पुनर्वसन होणार ?
आ. खडसेंनी मी भाजप प्रवेश न झाल्यास पुन्हा जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काम करणार असल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दिलेला दगाफटका जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खास करून रावेर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते विसरले असतील का ? आ.खडसेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी काही सेटलमेंट तर नाही ना ? अशी शंका आता राष्ट्रवादीच्या स्थानिक हाडाच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात आ.खडसेंच्या कन्या रोहिणी खेवलकर आणि चंद्रकांत पाटील झालेच तर भाजपकडून नंदकिशोर महाजन अशी तिहेरी लढत खूप हायव्होल्टेज होणार असल्याचे संकेत केव्हाच मिळालेले आहेत. त्यामुळे कन्या रोहिणी खेवलकरांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आ.खडसे आता सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुक्ताईनगरातील जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर विधानसभेसाठी रोहिणी खेवलकरांची उमेदवारी आधीच जाहीर केलेली आहे.त्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने प्रचारासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली देखील होती.मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा रोहिणीताईंचा दावा फोल तर ठरलाच आहे,उलट मतमोजणी नंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४६००० मतांनी श्रीराम पाटील पिछाडीवर पडलेले होते.