उद्धव ठाकरेंना आणखी एक सौम्य धक्का, ‘तो’ नेता सोडणार साथ ? राजकीय भूकंपांचा केंद्रबिंदू ‘मातोश्री’च का ठरतोय ?
'मातोश्री'प्रमुख वास्तुशांती करणार का ?
मुंबई दि-16, संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा गाजावाजा सुरू झालेला असून आता अवघ्या काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याने आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी जागा वाटपावरून पक्षातंर्गत खटके उडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.असे झाल्यास उद्धव ठाकरेंना आणखी एक सौम्य धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे.
‘मातोश्री’ बनलाय भूकंपांचा केंद्रबिंदू
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्यानं अंबादास दानवे चांगलेच नाराज झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एक-दोन दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात तशी चर्चा आता सुरू झाली आहे. अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे मराठवाड्यातील मोठे नेते आहेत, त्यांनी जर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला तर तो ठाकरे गटासाठी मोठा हादरा बसल्यासारखं असणार आहे.मात्र उद्धव ठाकरेंना गेल्या दोन वर्षांत अनेक मोठे धक्के बसल्याने त्या मानाने हा छोटासा सौम्य धक्का मानला जाऊ शकतो.उद्धव ठाकरेंची हादरे आणि धक्के पचविण्याची सहनशक्ती खूप असून भविष्यात अजूनही काही धक्के बसू शकतात,यांची त्यांना पूर्वकल्पना नक्कीच असणार, देशातील कोणत्याच राजकीय नेत्यांना त्यांच्याइतके मोठे हादरे आणि धक्के बसले नसतील एवढे धक्के उद्धव ठाकरेंनी सहन केलेले आहे. त्यामुळे त्यांना एक आमदार सोडून गेल्याचं दुःख कदाचित होणार नाही.
दरम्यान,शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं. ते त्यांनी अंबादास दानवे यांनाच उद्देशून म्हटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खैरे आणि दानवे यांचा वाद आता मातोश्रीवर पोहोचला आहे. काल मातोश्रीवर स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोघांशीही चर्चा केली, मात्र दानवेंबाबत तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायानं महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शहरात महाविकास आघाडीचा महाराष्ट्रभीमान मेळावा पार पडला, या मेळाव्यात मुख्य बॅनरवर दानवे यांचा फोटो देखील नव्हता, त्यामुळे देखील चर्चेला उधाणा आलेलं आहे.