क्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबई

घाटकोपर मृतांची संख्या १४,बेकायदा होर्डिंग्ज प्रकरणी बीएमसी आणि रेल्वेचे एकमेकांवर आरोप

मुंबई,दि-१४ मे, मुंबईच्या घाटकोपर परीसरातील छेडा नगर परिसरात काल सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मुंबईत जोरदार वारा सुटलेला असताना, छेडा नगरमध्ये जाहीरातीच एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. सगळा पेट्रोल पंप या होर्डिंगखाली दबला गेला.

दुर्घटनेच्यावेळी पट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 जण या पेट्रोल पंपावर होते. त्यावरुन पेट्रोल पंप किती मोठा होता ? याची कल्पना येतेयं. सोसाट्याचा वारा सुटलेला, त्यात पाऊस सुरु झालेला, त्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते, त्याचवेळी ही ह्दयद्रावक घटना घडली. या दुर्देवी घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई  महापालिकेचे अग्निशमन दल, NDRF ची बचाव पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहे.
घाटकोपरच्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झालेला असून होर्डिंग खाली अडकलेल्या ७४ नागरिकांना बाहेर काढले आहे. याठिकाणी  बचाव कार्य करत असताना खबरदारीचा उपाय म्हणून टँकरचा वापर केला जात नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले आहे. या सर्व जखमींवर जवळच्या राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अशातच मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने आपल्यापरीने जखमी झालेल्यांचे जीव वाचण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते किरीट सोमय्या, मिहिर कोटेचा, पराग शाह आणि महाविकास आघाडीचे नेते संजय दिना पाटील यांच्यात होर्डींग पडलेल्या ठिकाणी बाचाबाची झाली.किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्यानं संजय दिना पाटील भडकले तर भाजप नेते बचावकार्यात अडथळे आणत होते, तर सोमय्या यांच्यामुळे बचाव कार्य काही काळ थांबवलं, असे संजय दिना पाटील म्हणाले. इतकंच नाहीतर कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले का ? असा सवालही संतप्त होत संजय दिना पाटील यांनी केला आहे.
घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर महानगर पालिकेकडून संबंधित पडलेले होर्डिंग हे मध्य रेल्वेचे असून ते रेल्वेच्या हद्दीतील असल्याचे सांगण्यात आले. इतक नाही तर संबंधित होर्डिंगला लायसन्स नसून मुंबई महापालिकेने नोटीस बजावून हरकत घेतल्याचे म्हटले. हे होर्डिंग दिसावे म्हणून या हद्दीतील झाडांवर विषप्रयोग केल्याचे पालिकेने म्हटले आहे.या प्रकरणी पालिका रेल्वे आणि होर्डिग कंपनीवर गुन्हा करणार असल्याचे बीएमसीने म्हटले आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा फेटाळून लावताना, संबंधित होर्डिंग रेल्वेच्या जागेवर नसून त्याचा आणि भारतीय रेल्वेचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर परीसरात एकच गोंधळ उडालेला आहे. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अशी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.या दुर्घटनेतील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील तसेच आशा घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे एक्स वरून सांगितले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button