रावेर लोकसभेसाठी भाजपकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा
जळगाव दि- 1 ऑक्टोबर , राज्यातील भाजपच्या 4 विद्यमान मंत्र्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासाठी भाजपच्या गोटात विचार विनिमय सुरू असून त्यात राज्यातील भाजपचे वजनदार नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून 1995 पासून आतापर्यंत गिरीश महाजन निवडून आले आहेत. 1978 पासून ते राजकारणात आहेत. अभाविपचे तालुकाध्यक्ष ते आताचे विद्यमान मंत्री असा त्यांचा प्रवास राजकीय आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचे वर्चस्व महाजन यांनी गेल्या काही वर्षांत मोडीत काढल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा दूध संघ, जळगाव जिल्हा बँक अशा जिल्ह्यातील राजकारणावर पकड असणाऱ्या मोठ्या संस्था आता भाजपच्या ताब्यात खेचून आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मोठ्या प्रमाणावर व्यूहरचना आखली होती.त्यात त्यांना यश देखील मिळालेलं आहे. याचाच विचार भाजपचे पक्षश्रेष्ठी करत असून
जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. जळगाव मतदार संघात उन्मेष पाटील आणि रावेरमध्ये एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा श्रीमती रक्षा खडसे असे दोन विद्यमान खासदार आहेत. एकनाथराव खडसे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला असून ते राष्ट्रवादीचे विधानपरिषदेत सदस्य देखील आहेत. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून रावेर लोकसभा लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. त्यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना भाजप नेत्यांची पसंती असल्याची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या कुटुंबातील म्हणून रक्षा खडसे यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांना रावेर मतदार संघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या ऐवजी जेष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळण्याची बातमी समोर आलेली होती.त्यामुळे भाजपने आता लोकसभेसाठी उमेदवारांच्या चाचपण्या सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.