Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
अर्थकारणआरोग्यजळगावमहाराष्ट्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी अत्याधुनिक थ्री टी एमआरआय कार्यान्वित – मंत्री गिरीश महाजन

मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये- मंत्री गिरीश महाजन

जळगाव, दि.03/05/2025, – जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध उपचारांसाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री घेतली असून, आज अद्ययावत एमआरआय मशीनचे लोकार्पण झाल्यामुळे एवढ्या सुविधा असलेले हे राज्यातील पहिले केंद्र ठरले, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होतील, असे सांगून राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला.
केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक थ्री टी एमआरआय मशीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वित करण्यात आले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शेकडो नवजात बालकांना जीवनदान देणारी मिल्क बँक, मूतखड्यांसारख्या वेदनादायक आजारांवर मात करणारी लेझर मशीन यांसह अनेक अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज एमआरआय मशीन कार्यान्वित झाले असून, लवकरच सीटी स्कॅन मशीनही बसवण्यात येईल. अशी सर्व सुविधा असलेले हे शासकीय रुग्णालय राज्यातील पहिलेच आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय असे सर्व समाविष्ट असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मंत्र्यांकडून एमआरआय मशीनची पाहणी
हे मशीन कसे कार्य करते, त्यातील नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप काय आहे, दररोज किती रुग्ण तपासले जातील, यासारखी माहिती मंत्री पाटील व मंत्री महाजन यांनी सामान्यांच्या दृष्टिकोनातून जाणून घेतली.
थ्री टी एमआरआय मशीनची वैशिष्ट्ये :
ही यंत्रणा मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानावर आधारित असून ती शरीरातील अंतर्गत अवयवांची अति सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करते. मेंदू, मज्जासंस्था, हृदय, सांधे, कर्करोग निदान, पचनसंस्था आणि प्रजननसंस्थेतील तपासण्यांसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते. किरणोत्सर्ग न होत असल्याने ही चाचणी सुरक्षित आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
रुग्णांनी घ्यावयाची काळजी :
एमआरआय करताना धातुरहित कॉटनचे कपडे परिधान करावेत. कोणतीही धातूची वस्तू अंगावर न ठेवावी. पूर्वीच्या सर्व तपासणी अहवालांची फाईल सोबत आणावी. पेसमेकर, कॉक्लीअर इम्प्लांट, धातूचे इम्प्लांट असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचे लिखित प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ही तपासणी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार असून, शासननिर्धारित शुल्क आकारले जाईल.
आजपासून ही सेवा कार्यान्वित झाल्यामुळे जळगाव व परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले आहे.


Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button