महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत लागल्याच पाहिजे-सुप्रीम कोर्टाने सर्व व्यापाऱ्यांना दिला कडक इशारा !
व्यापारी संघटनांची याचिका फेटाळली
मुंबई दि-26 सप्टेंबर, “पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापना ह्यांच्यावर मराठी पाट्या मोठ्या अक्षरात ठळकपणे लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल कोर्टाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच दुकानदारांनी नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
मागील वर्षी राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने स्वतंत्र परिपत्रक काढून प्रत्येक दुकान, आस्थापना यांवर मराठीत तथा देवनागरी लिपीतच लिहिलेलं पाहिजे असे आदेश निर्गमित केले होते. याला मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने राज्यातील सर्वच दुकानं, आस्थापना ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तसेच स्थानिक मातृभाषेचा सन्मान करण्यात यावा असेही न्यायालयाने व्यापारी संघटनांना फटकारले आहे.