पुण्यात शताब्दी एक्सप्रेस येत असताना रेल्वे ट्रॅक गॅस सिलेंडरने उडवण्याचा मोठा कट उधळला
पुणे दि-31/12/24, पुणे जिल्ह्यातून एक धक्कादाय घटना उघडकीस आलेली असून उरळी कांचनजवळ रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवून रेल्वेला घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेसच्या लोकोपायलटच्या प्रसंगावधानाने उधळला गेला. उरळी रेल्वे स्टेशन ते लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडलेला आहे.
याबाबत रेल्वे सुरक्षा कर्मचारी असलेले शरद शहाजी वाळके (वय ३८, रा. सार्थक रेसिडेन्सी, वाघोली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उरुळी कांचन गावाचे हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५ पुणे बाजुकडे लोणी काळभोर रेल्वे ट्रॅकवर घडलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद वाळके हे रेल्वे सुरक्षा दलामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. सिकंदराबाद -पुणे शताब्दी एक्सप्रेस ही पुण्याकडे येत होती. या गाडीवर लोकोपायलट म्हणून आर टी वाणी हे काम करत होते. उरुळी कांचनहून गाडी पुण्याकडे पुढे निघाल्यावर एका रेल्वे विद्युत पोलजवळ रेल्वे ट्रॅकवर लाल रंगाची वस्तून ठेवली असल्याचे लोकोपायलट वाणी यांना लांबूनच दिसला. त्यांनी तातडीने गाडीचा वेग कमी केला. रेल्वेगाडी या सिलेंडरच्या अगदी जवळ येऊन थांबली. वाणी व ट्रेन मॅनेजर यांनी खाली उतरुन ट्रॅकवर असलेला सिलेंडरचे निरीक्षण केले़ प्रिया गोल्ड कंपनीचा लहान आकाराचा ३९.०० किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडर भरलेल्या अवस्थेत होता. वाणी यांनी याबाबतची माहिती उरुळी कांचन रेल्वे स्टेशन मास्टर यांना कळविली. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहचत हा गॅस सिलेंडर ताब्यात घेतला होता.
रेल्वे गाडी, रेल्वे प्रवाशांच्या जीवितास हानी पोहचविण्याच्या उद्देशाने व धोका निर्माण करण्याच्या हेतूने ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबतचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजगिरे हे करीत आहेत.