PWD व तापी पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता ठेकेदाराकडून हतनुर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये टाकले जातेय मुरूम, प्रशासन अनभिज्ञ
जळगाव,दि-04/12/24, जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद एक्सप्रेस हायवेच्या पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये संबंधित ठेकेदाराकडून जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता गौण खनिज टाकून पुलाच्या कामासाठी धरणाच्या बॅक वॉटर मध्येच गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या प्रशासनाच्या तोंडावर धूळफेक करून राजरोसपणे मुरूम टाकला जात असल्याचा प्रकार समोर आलेला असून, मात्र याबाबत संबंधित ठेकेदारावर अद्यापपावेतो प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये. संबंधित ठेकेदाराने याबाबत तापी पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अंधारात ठेवत या कामाला सुरुवात केलेली असून धरणाच्या बॅक वॉटर मध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम टाकल्यामुळे धरणाचे पाणी क्षेत्र कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणात आधीच मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने धरणाच्या जलसाठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्यातच आता ठेकेदाराकडून अवैधपणे कुठलीही परवानगी न घेता बॅक वॉटर मध्ये मुरूम टाकल्याने चिंता व्यक्त केला जात आहे. पुलाच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय, मात्र संबंधित ठेकेदाराकडून थेट बॅक वॉटर मध्येच मुरूम टाकून पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने याबाबत आता प्रशासनाकडून काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदाराने याबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती तापी पाटबंधारे विभागाने दिली असून याबाबत ठेकेदाराला नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती तापी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.