पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीयसंपादकीय

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘यांची’ नावे चर्चेत,तर आमदारांच्या मतदारसंघाच्या मतदानाचे होणार ‘ऑडिट’

भाजपच्या आमदारांचे तिकीट 'ऑडिट'वर अवलंबून

नवी दिल्ली, दि-३ जून २०२४ , लोकसभा निवडणुका आटोपल्या असून उद्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.अशातच कोणाच्या किती जागा निवडून येतील याबाबतचे देशभरातील एक्झिट पोलचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांनी सलग तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त केलेले आहेत. तसे झाल्यास पुन्हा एकदा केंद्रात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारात प्रचंड तेजीचा धमाका
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे मुंबई शेअर बाजारात खळबळ उडालेली असून बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये BSE सेन्सेक्स २,६२१.९८ अंकांच्या भरारीसह तब्बल ७६,५८३ अंकांवर उघडला जी निर्देशांकाची आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. याशिवाय, बाजाराच्या सुरुवातीला एनएसईचा निफ्टी ८०७.२० अंक किंवा ३.५८% शानदार तेजीसह २३,३७.९० अंकांवर ओपन उघडला. अशा प्रकारे एक्झिट पोलच्या अंदाजांनी शेअर बाजाराला ऐतिहासिक शिखरावर नेऊन पोहचवलेलं आहे.
निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप १०, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकात तेजी दिसून आली. मार्केटच्या सुरुवातीच्या कामकाजात पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स,अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय आणि लार्सन अँड टूब्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकाळपासूनच प्रचंड तेजीचा धमाका दिसलेला आहे.
भाजप नव्या अध्यक्षांची निवड करणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर भाजपची सत्ता आली तर सत्तास्थापनेनंतर भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी आता नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या अध्यक्षपदाच्या जागेसाठी विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चव्हाण यांची नाव चर्चेत आलेली असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह ?
बहुतांश एक्झिट पोलने देशात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी असून भाजपने एकूण ४८ जागांपैकी ४५ प्लसचे पाहिलेले स्वप्न एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ तर शिवसेनेने १५ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा लढवल्या होत्या. मात्र बहुतांश एक्झिट पोल मध्ये महायुती फक्त ३०च्या आतच जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता भाजपचा एक गुप्त अहवाल आलेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुका लढल्यास त्या निवडणुकीतही भाजपला सर्वाधिक फटका बसू शकतो असे या अहवालामधून समोर आले आहे.तसेच सध्याच्या नेतृत्वाकडे निवडणुकीतील यश मिळवण्याची क्षमता नाही. त्यांच्याकडे विश्वासाची कमतरता असल्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला अधिक संघर्ष करावा लागेल याची केंद्रीय भाजप नेतृत्वाला खात्री झालेली आहे. आता उद्याचा निकाल काय लागतो यावर सर्व गणिते आणि भविष्यातील समीकरण अवलंबून राहणार आहे.
आमदाराच्या मतदारसंघाचे होणार ‘ऑडिट’
महाराष्ट्रात 28 लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार उभे केलेले होते. या सर्व मतदारसंघांमध्ये असलेल्या भाजपच्या आमदारांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची आणि मतदानाची आकडेवारी तपासून त्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘ऑडिट’ करण्यात येणार आहे. यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालेल्या विद्यमान आमदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी राहणार आहे.अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button