रावेर लोकसभेसाठी शरदचंद्र पवार गटातर्फे श्रीराम दयाराम पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर
प्रसिद्ध उद्योजक आहेत श्रीराम पाटील
मुंबई दि-१० एप्रिल, काल महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होऊन झालेल्या पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फार्मूला निश्चित झालेला आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे राज्यातील सर्वच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून हा सस्पेन्स कायम ठेवण्यात होता.
या रावेर मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी त्यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केलेला होता. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतर मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून ठराव करण्यात आला होता, मात्र बऱ्याच दिवसांपासून उमेदवारीसाठी कोणाच्याच नावाची घोषणा होत नव्हती. काल संतोष चौधरी यांनी शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असे वक्तव्य केलेले आहे.
काल पुणे येथील मोदी बागेतील कार्यालयात पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या नेत्यांच्या उपस्थितीत रावेरच्या जागी संदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीत रावेरच्या जागे संदर्भात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावावर तब्बल पाच तास चर्चा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी ह्यांचे होते. त्यानंतर रवींद्रभैय्या पाटील यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते.
तसेच दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनाही पुण्यात मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले होते. त्यांची रावेर लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केलेली होती. यापूर्वी ते भाजपात सामील झालेले होते.मात्र त्यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेला होता. तरीही काल कुणाच्याच नावाची उमेदवारी घोषित करण्यात आलेली नव्हती. आज मात्र या रावेर लोकसभेसाठी प्रसिद्ध उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे.
कोण आहेत श्रीराम पाटील ?
सुप्रसिद्ध उद्योजक श्रीराम दयाराम पाटील हे गेल्या काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७१ रोजी रावेर तालुक्यातील रणगाव येथे झालेला आहे. ते श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष असून फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपली सामाजिक कार्याची ओळख निर्माण केलेली आहे.
त्यांचे प्रसिद्ध उद्योग व कंपन्या
१) श्रीराम ऑटो सेंटर (बजाज ऑटो डीलर) रावेर
२) श्रीराम मायक्रो व्हिजन अकॅडमी रावेर
३) श्री साईराम प्लास्टिक अँड इरिव्हेशन, रावेर, नशिराबाद, जळगाव
४) श्रीराम ऍग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज, रावेर, नशिराबाद
५) श्रीराम फाउंडेशन रावेर
६) ‘सिका’ नावाच्या मोठ्या इलेक्ट्रिक बाइक निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत.
श्रीराम पाटील यांचा महाराष्ट्र ,गुजरात ,राजस्थान, कर्नाटक ,मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात व्यापार विस्तार आहे.
त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सामाजिक कार्यातून जिल्ह्यात एक वेगळा ठसा उमटविलेला आहे.
त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून जनतेच्या मनात एक वेगळा स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांची मुख्य लढत ही भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी राहणार आहे त्यामुळे या लढतीकडे रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या नजरा लागून आहेत.