#लाडकी गृहसेविका योजना , मुंबई, दिनांक- 08/08/2024 राज्य सरकारनं महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड महाप्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुढील पंधरवाड्यात असंघटित क्षेत्रातील घरकाम करणाऱ्या मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील लाडकी ‘गृहसेविका’ या योजनेवर काम करत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ ने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीनं जाहीर करण्यात आली आहे.राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरात काही भागांत पसरल्यानंतर सोशल मीडियावर या नव्या योजनेची एकच चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी महिला व बाल विकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क करून या योजने संदर्भात माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना आणि कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार, मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी-कुंडी, कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे.
आज रोजी संपूर्ण राज्यात 12 ते 13 लाख घरकाम करणाऱ्या महिला मोलकरणींची संख्या असून, त्यांत 99 टक्के महिला आहेत. मात्र त्यात नोंदणीकृत किती आहे, हा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.येत्या आठवड्यात यासंदर्भात या मोलकरीण महिलांची शासन नोंदणी सुरू करण्याची मोहीम राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.या योजनेची वेबसाईट सुरू झाल्यानंतर याठिकाणी नोंदणी केल्यानंतर प्रत्येक नोंदणीकृत मोलकरीण महिलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार असून त्याचे बारकोड युक्त कार्ड छापण्यात येणार आहे. आता या योजनेकडे महिलांची कटाक्षाने नजर राहणार असून सरकार या योजनेची घोषणा कधी करते याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सरकारसाठी एक मोठी ‘गेम चेंजर’ योजना ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ही योजना अस्तित्वात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर १५ ते १८ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.