Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

गुंतवणूक परिषद म्हणजे जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि- ११/०४/२५, उद्योग सुलभतेसाठी 21 कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक ‘उद्योग भवन’ उभारले जात असून, कुसुंबा व चिंचोली येथे 285 हेक्टर जागेचे भूसंपादन करून नवीन MIDC विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून जागा उपलब्धते बाबत जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘प्लास्टिक औद्योगिक समूहा’ साठी उद्योजकांनी यासाठी सहकार्य करावे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहे. “ही गुंतवणूक परिषद केवळ गुंतवणुकीची नाही, तर जळगावच्या उज्ज्वल औद्योगिक भवितव्यासाठीचा निर्धार आहे. उद्योग केवळ नफ्यासाठी नसतात, ते समाज घडवण्यासाठी आणि भविष्य उभारण्यासाठी असतात. शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगावने आता औद्योगिक प्रगतीचे पंख लावावे,” असे भावनिक उद्गारही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चाळीस उद्योजकांशी करण्यात आलेल्या रु. 1636 कोटीचे सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद दि. 11 एप्रिल रोजी जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

परिषदेला संबोधित करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, “भुसावळसारखं देशातील महत्त्वाचं रेल्वे जंक्शन, नाशिक व संभाजीनगरला जोडणारे महामार्ग, जलसंपन्नता, मेहनती तरुणाई आणि महिलाशक्तीमुळे जळगाव जिल्हा उद्योगविकासासाठी अत्यंत सक्षम आहे.” या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील 40 उद्योगांमार्फत तब्बल 1636 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2848 रोजगारनिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. मागील वर्षी झालेल्या परिषदेत 1126 कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाले होते, त्यातील 9 उद्योगांनी प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले असून, 142 कोटींची गुंतवणूक करत 839 रोजगार निर्माण केले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मागील वर्षी 663 कर्जप्रकरणांना मंजुरी मिळवून जिल्ह्याने 90% उद्दिष्ट पूर्ण केले असून, पंतप्रधान रोजगार योजनेत 112% यश प्राप्त केले आहे.

शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी उद्योजकांचे योगदान हे महत्त्वाचे असून उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका वृषाली सोने यांनी केले. सूत्रसंचालन निवेदिका अपूर्वा वाणी यांनी केले. तर आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी मानले.

या गुंतवणूक परिषदेला चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे , एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे, लीड बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा, उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर. आर. डोंगरे. लघु उद्योग भारतीचे व इतर औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button