Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्र

वरणगावात गॅस गोडाऊन मधून ७४ हजारांचे ५८ सिलिंडर चोरी, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर चोरी होण्याची तालुक्यातील पहिलीच घटना

भुसावळ -तालुक्यातील वरणगाव येथील भारत गॅस कंपनी अंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ५८ भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी समोर आली. चोरट्यांनी चोरी केलेल्या सिलेंडरची एकूण किंमत ७४,१२४ रुपये इतकी आहे.
घटनेनुसार, वरणगाव ते मुक्ताईनगर महामार्गावरील लाल माती शिवारात रोहन गॅस एजन्सीचे हे गोडाऊन आहे. हे गोडाऊन एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (रा. भुसावळ) यांच्या स्वतःच्या जागेवर आहे. येथे एजन्सीच्या दुकानासाठी अतिरिक्त सिलेंडरचा साठा ठेवला जातो. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप व कडी-कोंड्या तोडून आत प्रवेश केला आणि उपलब्ध असलेले ५८ भरलेले सिलेंडर (प्रति सिलेंडर सुमारे १,२७८ रुपये दराने) चोरून नेले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडाऊनची सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती. गेल्या दोन वर्षांपासून तेथे चौकीदार किंवा सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद अवस्थेत होते. चोरट्यांनी याच परिस्थितीचा फायदा घेत रात्री डल्ला मारला.
गुरुवार सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गोडाऊन किपर शंकर किसन सुरवाडे (रा. वरणगाव, सिद्धेश्वरनगर) आणि कर्मचारी अभिलाष बावस्कर हे दोघे सिलेंडर घेण्यासाठी गोडाऊनवर गेले असता कुलूप तोडलेले आणि सिलेंडर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ एजन्सी संचालक नरेंद्र अहिरे यांना कळवले. त्यानंतर अहिरे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ही घटना वरणगाव परिसरात खळबळ माजवणारी ठरली असून, सुरक्षा व्यवस्थेच्या कमतरतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, लवकरच प्रकरण उघडकीस येईल अशी अपेक्षा आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button