भुसावळात पुन्हा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ६ वर्षीय बालिका गंभीर जखमी, कानाला सात टाके,अवघ्या १२ दिवसांत १६० नागरिकांना चावा घेतल्याची माहिती

भुसावळ : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणखी एका निष्पाप चिमुरडीला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पांडुरंग नाथ नगर येथील मातोश्री चौक परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वर्षीय आरोही माधव शर्मा हिच्यावर अज्ञात मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या कानावर, मानेवर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून कानाला तब्बल सात टाके पडले आहेत. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. आता सोमवार पासून शाळा सुरू होणार असल्याने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, “तारकेश झोपे प्रकरणानंतरही प्रशासनाला जाग का आली नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रभारी नगराध्यक्षांकडे धाव; मात्र प्रशासनाची कारवाई पुन्हा कागदावरच?
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनंतर सोमवारी दुपारी पालिकेचे पथक संबंधित भागात दाखल झाले. मात्र, यापूर्वीही केवळ दोन दिवस मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून ती अचानक बंद करण्यात आली होती.
कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी शहरातून गायब झाल्यानंतर पुन्हा कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची ही मोहीम केवळ दिखाऊ होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात हजारो मोकाट कुत्रे असताना किती निवारागृहे उभारण्यात आले ,याची माहिती समोर आलेली नाही.
पुन्हा “सुप्रीम’ आदेशाचा अवमान
सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सर्व राज्यांमधील प्रत्येक शहरात मोकाट कुत्र्यांसाठी निवारागृहे उभारून त्या ठिकाणी पकडून आणून त्यांची देखभाल करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र भुसावळ नगरपरिषदेच्या प्रशासनाला याचा विसरत पडलेला असून , वारंवार मोकाट कुत्र्यांचे नागरिकांवर प्राणघातक हल्ले होत असताना कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे वारंवार प्रशासनाने उल्लंघन करून अवमान होत असल्याने आता या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
तारकेश झोपेचा मृत्यू विसरला का?
२४ एप्रिल रोजी मोहित नगर परिसरातील शाळकरी विद्यार्थी तारकेश झोपे याच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या तारकेशवर दीर्घकाळ उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरभर संताप व्यक्त झाला होता आणि प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, काही दिवसांच्या दिखाऊ हालचालीनंतर संपूर्ण मोहीम थंडावली आणि पुन्हा नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. आता आरोही शर्मा या निष्पाप बालिकेवर झालेल्या हल्ल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अवघ्या १२ दिवसांत १६० जणांना चावा; धक्कादायक आकडेवारी
भुसावळ नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून आतापर्यंत तब्बल १६० नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. ज्यात ९७ पुरुष आणि ६३ महिलांचा समावेश आहे. अवघ्या १२ दिवसांतील ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून, शहरातील परिस्थिती किती भयावह बनली आहे, याचीच साक्ष देणारी आहे.
संबंधित विभागांवर नागरिकांचा संताप
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतरही प्रभावी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागांसह पाणीपुरवठा अभियंत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?
एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू, शेकडो नागरिक जखमी, आता सहा वर्षीय बालिका गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. तरीही मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, नियमित पकड मोहीम, कंत्राटदार कंपन्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
“आणखी किती निरपराध नागरिक आणि लहान मुलांचे जीव धोक्यात आल्यानंतर प्रशासन जागे होणार ?” असा संतप्त सवाल आता संपूर्ण भुसावळकरांकडून विचारला जात आहे.












