जळगावचे २ पोलीस तडकाफडकी निलंबित; कर्तव्यात कसूर ! एसएलआर रायफल बेवारस आढळल्या, पोलिस अधीक्षकांची धडक कारवाई
एसपींची बेशिस्त कर्मचाऱ्यांवर दुसरी मोठी कारवाई

जळगाव : पोलीस मुख्यालय, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ मे २०२६ रोजी रात्री ९.२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, जळगाव यांनी पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील गार्ड ड्युटीचे अचानक निरीक्षण केले. या तपासणीदरम्यान गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळून आले.
या तपासणीत आणखी धक्कादायक बाब समोर आली. गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ३ एसएलआर रायफल (बट क्रमांक ८२, २६२ व ८८२) या कोणताही दारुगोळा नसलेल्या अवस्थेत तसेच आवश्यक सुरक्षिततेची काळजी न घेता बेवारस स्थितीत पडून असल्याचे निदर्शनास आले. अत्यंत संवेदनशील ठिकाणी ड्युटीवर असताना अनुपस्थित राहणे आणि शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दाखवणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
प्रशासनाने याकडे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन म्हणून पाहिले असून, संबंधित दोन्ही अंमलदारांचे वर्तन शिस्तभंगाच्या चौकटीत बसत असल्याचे नमूद केले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी दोन्ही अंमलदारांना तत्काळ शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथेच राहणार असून, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कर्तव्यातील शिस्तभंगाबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.













