Advertisement
आरोग्यक्राईम/कोर्टजळगावराजकीय

सांडपाणी वाहिनीवरून साकेगावात संताप; ग्रामस्थांची प्रकल्पाला स्थगितीची मागणी, आरोग्य व पर्यावरण धोक्यात असल्याचा आरोप

खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागण्याची शक्यता ?

भुसावळ (प्रतिनिधी) :भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विश्वराज एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीमार्फत टाकण्यात येत असलेल्या सांडपाणी वाहिनीच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत प्रकल्पाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप गणेश दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी समस्यांचे निवेदन देऊन केला आहे.
निवेदनानुसार, कंपनीकडून साकेगाव गावाच्या हद्दीतून चांगल्या रस्त्याचे खोदकाम करून मोठ्या व्यासाची (अंदाजे १ ते १.२५ मीटर) सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही पाइपलाइन गावातील अनेक नागरिकांच्या घरांमधून तसेच नदी परिसरातून जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये भीती, संभ्रम आणि तीव्र अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, या कामासाठी प्रभावित नागरिकांची अथवा ग्रामसभेची योग्य संमती घेण्यात आली की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. एवढ्या महत्त्वाच्या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता काम सुरू करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भविष्यात पाइपलाइनला गळती, तडे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास सांडपाणी शेती, विहिरी, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच नदीमध्ये मिसळण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच पर्यावरणाचेही मोठे नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, ही पाइपलाइन सुमारे १५० ते २०० कुटुंबांच्या घरांमधून जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, इतर पर्यायी मार्ग उपलब्ध असताना गावाच्या मध्यवस्तीतूनच पाइपलाइन टाकण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वी विविध विकासकामांमध्ये त्रुटी राहिल्याचा अनुभव असल्याचे नमूद करत केवळ तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक तांत्रिक तपासणीची आवश्यकता असल्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
◾प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक व पर्यावरणीय तपासणी करण्यात यावी.
◾ग्रामस्थांच्या उपस्थितीत खुली जनसुनावणी आयोजित करण्यात यावी.
◾पाइपलाइनच्या सुरक्षितता, देखभाल व भविष्यातील जबाबदारीबाबत कंपनीकडून लेखी हमी घेण्यात यावी.
◾संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणामांचा सविस्तर अहवाल ग्रामस्थांसमोर सादर करण्यात यावा.
◾शक्य असल्यास गावातील मध्यवस्तीऐवजी पर्यायी मार्गाने पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा.
◾साकेगावच्या ग्रामस्थांनी गावाच्या आरोग्य, सुरक्षितता आणि भावी पिढ्यांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, संबंधित कामाला स्थगिती द्यावी आणि सर्व बाबींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
विजय सातव, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत साकेगाव यांची प्रतिक्रिया :
“विश्वराज एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या सांडपाणी वाहिनी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी मांडलेल्या आक्षेपांची आम्ही दखल घेत आहोत. मात्र, संबंधित पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी सुमारे एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाच्या आधारे ग्रामपंचायतीने कंपनीला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) दिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
सध्या ग्रामस्थांनी नव्याने काही आक्षेप आणि शंका उपस्थित केल्याचे निवेदन दिले आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभाग योग्य ती पडताळणी करून आवश्यक निर्णय घेतील. ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत असून, नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.”

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp