Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावनोकरी

भुसावळच्या मृद व जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

भुसावळ, दि-26 ,भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात शासकीय वेतन प्रणालीत कथित फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विभागातील वरिष्ठ लिपिक तनुज रवींद्र सैंदाणे (रा. पवन हिल्स, जळगाव) यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, पूरक देयके तयार करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी होती. या अधिकाराचा कथित गैरवापर करत फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये स्वतःच्या मूळ वेतनासह विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ करण्यात आली.
या फेरफाराच्या आधारे तयार करण्यात आलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी तथा उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून आरोपीने ७० लाख ३८ हजार ३७ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचा आरोप आहे.
याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि DCPS कपातीच्या रकमेतही कथित फेरफार करून १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या NPS खात्यात जमा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ जून रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आर्थिक व्यवहार, ‘सेवार्थ’ प्रणालीतील कथित फेरफार आणि संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp