Advertisement
क्राईम/कोर्टजळगावशैक्षणिक

‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’अंतर्गत भुसावळात दामिनी पथकाची धडक मोहीम; विद्यार्थिनींशी साधला थेट संवाद, टवाळखोरांवर ठेवला वचक

Dysp केदार बारबोले यांचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने धडक मोहीम राबवून शाळा व महाविद्यालयीन परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम पार पडली.


शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच बस स्थानक परिसराला भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि सुरक्षेसंदर्भातील अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (WPSI) काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच कोणत्याही प्रकारच्या छेडछाड, त्रास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात वावर करणाऱ्या टवाळखोरांवर वचक निर्माण करण्यासाठी दामिनी पथकाने विशेष गस्त घालत प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे शैक्षणिक परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली. आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस हेल्पलाईन, तक्रार निवारण यंत्रणा तसेच तातडीच्या मदतीसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना निर्भयपणे शिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षणासाठी पोषक व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असून, आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp