भुसावळात तरुणीवर अत्याचार व जबरदस्ती धर्मांतराचा आरोप; आरोपी अटकेत
वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे चिंता

भुसावळ (दि. 18 मे 2026) — मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर सुरुवातीला मध्यप्रदेशातील सिवनी मालवा, जि. नर्मदापूरम येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी नवील शेख (रा. भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्षणादरम्यान ओळख, नंतर मैत्री
पीडित तरुणी मूळची मध्यप्रदेशातील रहिवासी असून ती दहावीत शिक्षणासाठी भुसावळ येथे आपल्या आजोबांकडे राहत होती. शिक्षणादरम्यान तिची आरोपी नवील शेख याच्याशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. तक्रारीनुसार, दोघांच्या काही वेळा शहरातील एका कॅफेमध्ये भेटीगाठी झाल्या होत्या. याच काळात आरोपीने तरुणीचे काही फोटो मोबाईलमध्ये काढले होते.
दरम्यान आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. मात्र दोघांचे धर्म वेगळे असल्याचे सांगत पीडितेने लग्नास नकार दिला होता.
फोटो व्हायरल करण्याची धमकी
पीडितेच्या तक्रारीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी आरोपीने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. ती भेटण्यास तयार नसल्याने आरोपीने तिच्या कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी दिली तसेच दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धमक्यांमुळे घाबरलेल्या पीडितेला आरोपीने सुंदरनगर परिसरातील एका खोलीवर नेले. तेथे तिच्यावर तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जबरदस्ती धर्मांतर व निकाहाचा आरोप
तक्रारीनुसार, 7 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला दुसऱ्या दिवशी पहाटे तयार राहण्यास सांगितले. लग्नासाठी सोबत न आल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याने ती घाबरली आणि आरोपीसोबत गेली.
यानंतर आरोपीने तिला प्रथम सुंदरनगर येथील खोलीवर आणि नंतर दीपनगर परिसरातील एका रूमवर नेले. तेथे काही मौलाना उपस्थित होते. त्यांनी पीडितेला कलमा पठण करण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिल्यानंतर आरोपी नवील शेख याने “कलमा न पढल्यास जिवंत मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जीवाच्या भीतीने आपण कलमा पठण केले आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्नविधी पार पडल्याचे पीडितेने म्हटले आहे.
बुरखा घालण्याची सक्ती, मारहाणीचाही आरोप
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नविधीनंतर आरोपीने तिला सुंदरनगर येथील खोलीवर सुमारे आठ दिवस ठेवले. या काळात आरोपी तिच्यावर बुरखा घालण्याची सक्ती करत होता. तसे न केल्यास मारहाण केली जात असल्याचाही आरोप तिने केला आहे.
दरम्यान, पीडितेची आरएसएस, बजरंग दल आणि कुटुंबीयांच्या मदतीने सुटका करण्यात आली. त्यानंतर ती आपल्या मूळ गावी परत गेली.
सिवनी मालवा येथे तक्रार, गुन्हा भुसावळात वर्ग
पीडित तरुणीने 10 मे 2026 रोजी सिवनी मालवा महिला हेल्प डेस्क येथे लेखी तक्रार दिली. त्यानुसार सिवनी मालवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी प्रकरण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.
या प्रकरणी आरोपी नवील शेख विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2), 127(3), 351(3) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयीन कोठडी
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.













