Advertisement
जळगावराजकीय

भुसावळातील कचरा संकलन रात्रीपासून सुरू,मंत्री संजय सावकारेंच्या हस्तक्षेपामुळे घंटागाड्यांचा डिझेलचा प्रश्न सुटला, स्वच्छतेचा प्रश्न सुटणार

उद्यापासून नियमित घंटागाड्या फिरणार

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत नगरपरिषदेतील सध्याच्या राजकीय घडामोडी, शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरील गंभीर प्रश्नांबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने नुकतेच गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयाविरोधात गायत्री भंगाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे. नगरपरिषदेच्या अधिनियमानुसार नगराध्यक्ष अपात्र ठरल्यानंतर तात्पुरता पदभार उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे यांच्याकडे सोपविणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे सत्तेची अस्थिरता निर्माण झाली असून प्रशासन दिशाहीन झाल्याचा आरोप भाजपने केला.
कचरा प्रश्नावर मंत्री सावकारेंचा हस्तक्षेप
शहरातील कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाड्यांचे डिझेल संपल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले होते. नगरपरिषदेची देयके थकित असल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल पुरवठा थांबविला होता. तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या सह्याद्री कंपनीनेही कामकाज बंद केले होते.

याबाबत भाजप नगरसेवकांनी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर मंत्री सावकारे यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित पंपचालकाला विश्वास दिला आणि डिझेल पुरवठा सुरू करण्यास सांगितले. पंपचालकाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आजपासून पुन्हा साफसफाईच्या कामास सुरुवात होणार असून, पुढील ७२ तासांत शहरातील कचरा संकलन पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली.
“सत्ताधाऱ्यांनी आठ वर्षांची व्यवस्था मोडीत काढली”
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी आरोप केला की, मागील आठ वर्षांपासून सुरळीत सुरू असलेली घंटागाडी व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी बंद पाडली. यापूर्वी शहराला स्वच्छतेबाबत ‘माझी वसुंधरा’ योजनेत पुरस्कारही मिळाला होता.
“गायत्री भंगाळे सत्तेत आल्यानंतर कचरा संकलन आणि स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला. आधीची सक्षम व्यवस्था बदलून नियोजन विस्कळीत करण्यात आले. त्याचाच परिणाम आज शहराला भोगावा लागत आहे,” असा आरोप भाजपने केला.
भाजपने पुढे नमूद केले की, नियमित मुख्याधिकारी राजेंद्र फातले हे महिनाभराच्या रजेवर असल्याने प्रशासन पूर्णतः सैरभैर झाले आहे.
संतोष चौधरींच्या प्रश्नाला भाजपचे प्रत्युत्तर
माजी आमदार तथा नगरसेवक संतोष चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे “ओबीसी समाजाचा व्यक्ती प्रभारी नगराध्यक्ष कसा होऊ शकतो ?” असा प्रश्न उपस्थित केला असल्याचा दावा नगरसेवक गिरीश महाजन यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “ज्यांनी विधीमंडळाचे सदस्यत्व भूषविले आहे, त्यांनी असे विधान करणे आश्चर्यकारक आहे. लेवा पाटीदार समाजाची मुलगी व सून असलेल्या शैलैजा नारखेडे या प्रभारी नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासासाठी काम करत असतील, तर त्यात कोणाला अडचण असण्याचे कारण नाही. त्या गेल्या १५ वर्षांपासून अनुभवी नगरसेविका आहेत.” त्यामुळे त्यांना नगरपरिषदेच्या कामकाजाचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास आहे.
२०१६ चा डाग आम्ही पुसला; पुन्हा स्वच्छता प्रस्थापित करू”
नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी सांगितले की,
“२०१६ मध्ये शहरात घाणीचे साम्राज्य होते. भाजपने सत्ता मिळाल्यानंतर स्वतःच्या खर्चाने अनेक वार्डांत घंटागाड्या सुरू करून शहर स्वच्छ व नावारूपाला आणले होते. मात्र गेल्या चार महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी विकासकामांची आणि स्वच्छतेची अक्षरशः वाट लावली.”
त्यांनी पुढे सांगितले की, मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जशी विकासकामे पूर्वी झाली, तशीच पुन्हा सुरू होतील आणि स्वच्छतेचा प्रश्नही तातडीने मार्गी लावला जाईल.
नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी माहिती दिली की, मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कचरा प्रश्नावर मंत्री सावकारे आणि गटनेते युवराज लोणारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागील ठेकेदाराला पुन्हा काम सुरू करण्यास सांगितले असून त्यानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पत्रकार परिषदेला यांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, गिरीश महाजन, प्राची उदय पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, प्रकाश बतरा, आशिष पटेल, संतोष (दाढी) चौधरी, सोनल महाजन तसेच माजी नगरसेवक सतीश सपकाळे, देवा वाणी, अजय नागराणी, चेतन सावकारे, उदय पाटील, अल्बर्ट तायडे, रूपेश देशमुख आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष, न्यायालयीन प्रक्रिया आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp