Advertisement
क्राईम/कोर्टजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीयशैक्षणिक
Trending

बनावट शालार्थ आयडीद्वारे भरती झालेल्या ३ शिक्षकांना पहिल्यांदाच पोलिसांनी केली थेट अटक, राज्यातील पहिलीच मोठी कारवाई, शिक्षकांमध्ये मोठी खळबळ

750 पेक्षा अधिक बोगस शिक्षकांनी केलायं 300 कोटींचा घोटाळा ?

नागपूर,दि-०१/०८/२५, संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अधिकारी संस्थाचालकांनंतर आता पोलिस यंत्रणेच्या टार्गेटवर थेट लाभार्थी शिक्षक आले आहे. या प्रकरणी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विविध आमदारांनी या बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशीसाठी एसआयटीची घोषणा केल्यानंतर  पहिल्यांदाच पोलिसांनी प्रत्यक्ष बनावट शालार्थ आयडीच्या मदतीने वेतन मिळविणाऱ्या नागपुरातील तीन शिक्षकांना अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. इतरांवरदेखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता दाट वर्तविण्यात येत आहे. दोन दिवसांतील दोन मोठ्या कारवायांमुळे शिक्षण विभागासह बोगस शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे भरती झालेल्या राज्यभरातील इतर शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाची कारवाई
इतर शिक्षकांचेही दणाणले धाबे. पोलिसांनी गुरुवारी मानेवाडा येथील शिक्षक विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक सतीश विजय पवार (३४, शाहूनगर, मानेवाडा), सहायक शिक्षिका प्रज्ञा वीरेंद्र मुळे (३८, सूर्योदयनगर, म्हाळगीनगर ) तसेच बोरगावमधील आदर्श प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षिका भूमिका सोपान खाते (३९, सर्वश्रीनगर, उमरेड मार्ग, दिघोरी) यांना अटक केली आहे.
यासाठी शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट आयडी तयार केले आहे. त्यामाध्यमातून बोगस शिक्षकांना शासनाकडून वेतनदेखील अदा करण्यात आलेले आहे. या घोटाळ्यात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बुधवारीच प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली होती. बोगस शालार्थ आयडी असलेल्या ६३२ आरोपींचा ‘सतरा’चा खतरा केवळ बोगस शालार्थ आयडीच्या प्रकरणात आतापर्यंत सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात तीन शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, चार लिपिक, दोन शाळा संचालक, दोन शाळा मुख्याध्यापक व तीन शिक्षकांचा समावेश आहे.
तीन शिक्षकांना २२ महिन्यांत २५ लाखांहून अधिक वेतन
तीन आरोपींनी अधिकारी व दलालांसोबत संगनमत करून नोकरी मिळवली व त्यातूनच बोगस शालार्थ आयडी तयार केले. सतीश पवार ऑगस्ट २०२३ पासून नोकरीवर होता, तर प्रज्ञा मुळे व भूमिका नखाते या जून २०२४ पासून नियमित वेतन घेत आहेत. या कालावधीतच तिघांनी शासनाकडून २५ लाखांहून अधिकचे वेतन घेतले. या रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याची बाब समोर आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली.
शिक्षकांना चौकशीसाठी बोलविण्याची प्रक्रियादेखील शिक्षण विभागाकडून सुरू झाली होती. दरम्यान, पोलिसांनी थेट शिक्षकांनाच अटक केल्यामुळे आता इतरांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिक्षण अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन
विनाचौकशी अटकेचा निषेध : राज्यभरातील शिक्षणाधिकारी एकदिवसीय सामूहिक रजेवर जाणार
राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर विनाचौकशी बनावट शालार्थ आयडीद्वारे बॅकडेटेड शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अटकसत्र सुरू असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी संपूर्ण राज्यात शिक्षण विभागातील अधिकारी एक दिवसीय कामबंद आंदोलन’ करीत आहेत. नागपूर येथून उगम पावलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील दोन शिक्षण अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण प्रशासनात खळबळ माजली होती. संबंधित अधिकाऱ्यांना अटक ही “चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी असल्याचे मत शिक्षणाधिकारी संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेचे भ्रष्टाचाराला समर्थन आहे का ?
राज्यातील काही ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक , संस्थाचालक, शिक्षणाधिकारी ,वेतन अधीक्षक, शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या कार्यालयातील लेखापाल अधिकारी अशी ही संपूर्ण साखळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण करून अनेक ठिकाणी प्रथमदर्शनी झालेल्या तपासणीत उघडकीस आले आहे. या सर्वांनी संगनमताने मिळून शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी बनवून त्यांची बनावट शासन निर्णयाच्या आधारे बॅकडेटेड नियुक्ती दाखवून याप्रकरणात राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी विधिमंडळात हा मुद्दा राज्यातील विविध भागातून अनेक आमदारांनी प्रकर्शाने लक्षवेधी मांडून उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी गठित करण्यात आली आहे. तपासात आर्थिक घोटाळा आढळून आल्याने पोलिसांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. प्रथमदर्शनी घोटाळा होऊन शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह इतरांना अटक केली. अशा परिस्थितीत विनाचौकशी अटक केल्याचे कारण पुढे करून आंदोलन करीत असल्याने महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिकारी संघटनेचे भ्रष्टाचाराला समर्थन आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
गुन्हेगार नव्हे, तर अधिकारी’
महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे, कार्याध्यक्ष रवींद्र वाणी, सरचिटणीस रारोज जगताप, कोषाध्यक्ष डॉ. ज्योती परिहार व कार्यालयीन सचिव समरजीत पाटील आदींनी संयुक्त निवेदनात म्हटले की, “राजपत्रित अधिकारी प्रामाणिकपणे शासनाचे काम करीत असून, कदाचित त्यांच्या कामात त्रुटी असू शकतात. मात्र, त्यावर विभागीय चौकशीचा पर्याय उपलब्ध आहे.
असा दिला संघटनेने इशारा
विनाचौकशी अटक न करण्याची शासनाची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर वेतन देयकावर सह्या केल्या जाणार नाहीत. सुटीच्या दिवशी होणाऱ्या कामाचा ताण कमी करण्यात यावा. मागण्या मान्य न झाल्यास ८ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button