जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

अवैध वृक्षतोड केल्यास आता 50 हजारांचा दंड,आ. संजय सावकारेंच्या मागणीला मोठे यश

हायवे,दिपनगर संच,व सातपुड्यातील वृक्षतोडीवर तारांकित प्रश्न

मुंबई, दि. 12 जुलै : जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या चिखली ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्यांनी काम सुरू होण्याआधीच या मार्गातील हजारो वृक्ष तोडून टाकलेली होती. आज या महामार्गाचं कामकाज पूर्ण होऊन काही वर्षे झालेली आहे , मात्र तरीही या कंपनीने फक्त दहा टक्केच वृक्ष लावलेली आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जेवढी झाडे तोडली गेली, त्याच्या दुप्पट झाडे लावण्याचा नियम करारामध्ये नमूद असुन संबंधित कंपन्यांवर ते निकष बंधनकारक आहे. तरी या कंपन्यांवर आता कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दिपनगर येथील दोन  मोठे विद्युत निर्मिती संच सुरू करणाऱ्या ठेकेदार कंपनीने सुद्धा त्या ठिकाणी शेकडो वृक्षे तोडून टाकलेली असून त्यांनी सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी नियमानुसार वृक्ष लागवड केलेली दिसून येत नाही. तसेच सातपुडा पर्वतरांगेतील यावल अभयारण्य क्षेत्रातील जंगलात सुद्धा मध्य प्रदेशातील आदिवासींनी शेकडो हेक्टर जमीनीवर बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून वनक्षेत्रावर कब्जा केलेला आहे.या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर ठोस आणि मोठी कडक कारवाई करण्याची आक्रमक मागणी आज भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत केलेली आहे.
   याबाबत, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरीत आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी वृक्षतोड अधिनियम 1964 अन्वये 1 हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येतो. मात्र हा दंड कमी असून यामध्ये आता अवैध वृक्षतोड रोखण्याण्यासाठी 50 हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केलेली आहे.
      यासंदर्भात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी आज विधानसभेत हा वृक्षतोडीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार  सर्वश्री डॉ. राहुल पाटील, भिमराव तापकीर, मनीषा चौधरी, राम कदम यांनी सहभाग घेतला होता.
   याबाबत अधिकची माहिती देताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काही अपरिहार्य कारणास्तव वृक्षतोडीची परवानगी मागितल्यास, त्याची शहानिशा करून विहीत कालावधीत परवानगी देण्याबाबतची कार्यपद्धती आणण्यात येईल. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेनुसार राज्यामध्ये 2015 पासून वृक्षलागवड मोहिमेमुळे वनेतर क्षेत्रातील हरीत आच्छादनात 2 हजार 550 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे. तसेच मॅग्रोव्ह वनामध्ये झालेल्या वाढीमध्ये राज्य क्रमांक एकवर आहे. वृक्षलागवडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘माँ के नाम एक वृक्ष’ ही घोषणा केली आहे. उद्योगांकडून उत्सर्जित होणाऱ्या  कार्बन क्रेडीटबाबत सुस्पष्ट धोरणाची आवश्यकता आहे. उद्योगांनी जेवढे कार्बन उत्सर्जित केले, तेवढे वृक्ष लावले पाहिजेत. राज्यात एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी (फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ची स्थापना करण्यात आली आहे.
     शेतकरी विदेशी जातीचे वृक्षही लावू शकतात. त्यावर कुठलेही बंधन नाही. वनशेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. बांबू प्रजातीच्या 8 जातींना 175 रुपये अनुदान तीन वर्षापर्यंत देण्यात येत आहे. हे अनुदान आता 10 हजार हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशाऐवजी बांबूपासून बनविलेले बांबू पॅलेट्स उपयोगात आणण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित उपवनसंरक्षक यांच्यास्तरावर दर दोन महिन्यांनी लोकप्रतिनिधींसमावेत बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतील. या बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील वन विषयक अडचणी आणि समस्यांचे समाधान करावे, असेही वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button