
जळगाव दि-23/04/25, जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामधील जल जीवन मिशन अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना संपूर्ण लोकसंख्येची सध्याची आणि भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुधारित योजना 55 एल पी सी डी प्रदान करण्यासाठी करण्यात आली असून या कामाला तात्काळ प्राधान्य देण्यात यावे. याअंतर्गत येणाऱ्या गावाला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे निर्देश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सायंकाळी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत दिलेले आहे.
मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागाच्या दालनात बोदवड तालुक्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेविषयी आयोजित बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते. या बैठकीत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील ,आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन चे संचालक इ.रविंद्रन,सह सचिव बी.जी.पवार यांच्यासह अंबरनाथ येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.