आ.संजय सावकारेंच्या लोकप्रियतेसह मताधिक्यात प्रचंड वाढ, नगराध्यक्षपद राखीव झाल्यास पल्लवी सावकारेंचे नाव चर्चेत
आ.संजय सावकारेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता ?
जळगाव दि-24/11/2024, भुसावळ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर यांचा 46955 मतांनी पराभव करून अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवलेला आहे. आमदार संजय सावकारे यांना एकूण 106096 मते पडलेली असून आजवर भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात एक लाख मतांचा टप्पा पार करणारे ते एकमेव भाजपचे आमदार म्हणून आता इतिहासात नोंद केली जाणार आहे. त्यांना यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत असून ते 2009 मध्ये पहिल्या टर्म मध्ये निवडून आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाल होती. यावेळी प्रमुख विरोधी उमेदवार असलेले काँग्रेसचे डॉ राजेश मानवतकर यांना 59141 मते पडलेली आहे. गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांना 55% मते मिळालेली होती. यावेळी त्यात 3 टक्क्यांनी वाढ होऊन एकूण मतांच्या 58% मताधिक्य घेऊन ते विजय झालेले आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत आमदार संजय सावकार यांच्या मताधिक्यात भरघोस वाढवताना दिसून आलेली असेल त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांमुळे जनतेने त्यांना पुन्हा एकदा निवडून आणून आमदारकीच्या रूपाने जनसेवेची संधी दिलेली आहे. विशेष म्हणजे आमदार संजय सावकारे यांनी यावेळी भुसावळ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही नेत्यांची जाहीर सभा न घेता आणि कोणत्याही विरोधी उमेदवारांवर टीका टिप्पणी न करता फक्त त्यांनी गतकाळात केलेल्या विकास कामांच्या बळावरच मतदारांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीसाठी घेऊन आपल्या विवेकी स्वभावानुसार मतांचा जोगवा मागितलेला होता. प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि झालेले भव्य स्वागत यामुळे त्यांचा विजय आधीच निश्चित मानला जात होता. फक्त त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती ,अशी परिस्थिती प्रचाराच्या दरम्यान दिसून येत होती.
नगरपालिका क्षेत्रातून भरघोस मतदान
भुसावळ शहर नगरपालिका क्षेत्रातून भाजपचे आमदार संजय सावकारे यांना एकूण मतदानाच्या तब्बल 63 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीहून दिसून येत असून आगामी भुसावळ नगरपालिका निवडणुकीत भाजपासह महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. गेल्यावेळी देखील भाजपला भुसावळ नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षासह नगरपरिषदेमध्ये मोठा विजय मिळालेला होता. त्याची आता पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते की काय ? अशी परिस्थिती सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या राज्यात भाजपला मिळालेले प्रचंड यश पाहता महायुतीचे पारडे जड मानले जात असून त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भुसावळ नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्यासाठी आतापासून फिल्डिंग लावली जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता पुन्हा एकदा भाजपकडून लेवा पाटीदार समाजाचा उमेदवार लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उभा केला जाऊ शकतो. मात्र नगराध्यक्षपद हे राखीव झाल्यास या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्या आणि विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या वहिनी सौ.पल्लवी प्रमोद सावकारे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पल्लवी प्रमोद सावकारे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या गैरप्रकारांचा पर्दाफाश करून जिल्ह्यात कर्तुत्ववान महिला म्हणून दबदबा निर्माण केलेला होता. मात्र सौ पल्लवी सावकारे या आता जिल्हा परिषद निवडणूक लढणार की नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार हे येणाऱ्या काळात निवडणूक आयोगाद्वारे जाहीर होणाऱ्या आरक्षणातून स्पष्ट होणार आहे.