केळीच्या दरात झाली 300 रुपयांनी वाढ, जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्तीने केळी उत्पादक सुखावले
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कर्तव्यनिष्ठतेचे शेतकऱ्यांकडून कौतुक
जळगांव-दि.8 जिल्ह्यातील रावेर व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र काढणी झालेल्या केळीचे दर हे बऱ्हाणपूर बाजार समितीच्या दरा वर अवलंबून असल्याने सातत्याने केळीला कमी भाव मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बऱ्हाणपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून केलेल्या मध्यस्थीमुळे केळीच्या दरात किमान 300 रुपयानी वाढ झाली असून या बाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील रावेर व परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. काढणी झालेल्या केळीला बाजारात विक्री करताना बऱ्हाणपूर येथील बाजार समितीने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना केळीची विक्री करावी लागत होती. याबाबत या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपल्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक कामात व्यस्त असताना देखील रविवारी त्यांनी बऱ्हाणपूर गाठत जिल्हाधिकारी सुश्री मित्तल यांची भेट घेतली. व रावेरची केळी ही दरासाठी बऱ्हाणपूर येथील बाजार समितीवर अवलंबून असल्याची बाब लक्षात आणून दिली. त्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याशी देखील संपर्क साधून केळीच्या भावात गफलत करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या टोळीवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच केळी उत्पादक शेतकरी व बाजार समिती यांची बैठक घेऊन याबाबत उपाययोजना करण्याचे सूचित केले. त्यासोबतच बऱ्हाणपूर येथे होणाऱ्या केळी लिलावा वेळी शासकीय प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याबाबत सूचना केली. त्यानुसार मंगळवारी केळीचा लिलाव झाला. आणि लिलावाच्या वेळी केळी दरात तब्बल 300 रुपयांनी वाढ झाली. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे मंगळवारी लिलावाच्या वेळी केळी उत्पादकांना 1295 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी रावेर येथे केळी उत्पादक शेतकरी व बाजार समितीच्या प्रतिनिधींच्या घेतलेल्या बैठकीत शेतकरी व व्यापारी यांनी बऱ्हाणपूर पेक्षा रावेर परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने केळीचा लिलाव रावेर बाजार समितीत व्हावा अशी आग्रही भूमिका मांडली.या वेळी बाजार समिती सभापती, सचिव व केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.