देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळ नेतेपदाच्या प्रस्तावाला आमदार संजय सावकारे यांचे अनुमोदन
मुंबई,दि-04/12/24, राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र स्पष्ट झालेले आहे. महायुतीतील भाजपने आज मुख्यमंत्रीपदासाठीचं नाव जाहीर झालं आहे. आज भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाचं आणि विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे आता शपथविधीचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.आज पार पडलेल्या विधीमंडळाच्या गटनेता पदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या (गुरूवारी) 5 डिसेंबर रोजी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहतील.
आज भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात सादर केला. त्याला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचेसह आमदार प्रवीण दरेकर,पंकजा मुंडे व इतर तीन आमदारांनी अनुमोदन दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळ गटनेचेपदी निवडीसाठीच्या सादर प्रस्तावाला जळगाव जिल्ह्यातून अनुमोदन देणारे आमदार संजय सावकारे हे एकमेव भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे भाजप पक्षश्रेष्ठींकडे वजन वाढल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या मंत्रीपदाच्या शक्यता देखील आता वर्तवल्या जात आहे. त्यांनी यापूर्वी 2013 मध्ये राज्यमंत्रीपदासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविलेले आहे.