नाशिकमध्ये चार पत्रकारांवर गावगुंडांचा भ्याड हल्ला, गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे चार ते पाच पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीची घटना समोर समजताच यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेत काही पत्रकारांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सांगितले की, पत्रकारांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, या प्रकरणात दोषींना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दुखापत झालेल्या पत्रकारांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली. तर या प्रकरणी आता पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.

नेमके काय घडले
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तीन पत्रकारांवर गावगुंडांनी जबर हल्ला केला. या हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण ताजणे यांनी मारहाणीच्या घटनेवेळी नेमकं काय घडलं ते सांगितले. किरण ताजणे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी आलो आहे, असे सांगूनही अवैध कार पार्किंग फी वसुल करणाऱ्या गुंडांनी त्यांना जबर मारहाण केली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत हल्ला केला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे आणि पत्रकार संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.













