पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीनाचे ‘फेक ब्लड सॅम्पल रिपोर्ट’ प्रकरणी 2 डॉक्टरांना अटक- सीपी अमितेशकुमार
पुणे दि:27 मे- पुण्यात झालेल्या भीषण अपघात प्रकरणी ससून रुग्णालयात जाऊन शहर गुन्हे शाखेने आज सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या डॉक्टरांनी अल्पवयीनच्या रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात फेकले, त्यानंतर त्यांनी संबंध नसलेल्या तिसऱ्याच व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचं भासवत खोटा अहवाल दिला, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
याविषयी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही संपूर्ण धक्कादायक माहिती दिलेली आहे. ते पुढे म्हणाले की,आम्ही हॉस्पिटलमधील संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि हेराफेरी लक्षात आली. त्यानंतर आमच्या टीमने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात नेमणुकीस आहेत, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सांगितलेलं आहे.
अपघात झाल्यानंतर १९ मे रोजी ११ वाजता अल्पवयीनच्या रक्ताचे जे नमुने घेण्यात आले होते ते दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आले होते. त्यानंतर ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त यांनी दिलेली आहे.
दरम्यान, जो अल्पवयीन गाडी चालवत होता त्याचे ब्लड सँपल ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकले. त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घतले आणि त्यावर अल्पवयीन आरोपीचं नाव लिहून हे त्याच्या रक्ताचे नमुने आहेत असं भासवत ते पुढे टेस्टला पाठवण्यात आले. फॉरेन्सिक लॅबचे सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे सगळे ब्लड सँपल घेतले आणि रिप्लेस केले होते. त्यांना काल ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली असता डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याचं समोर आलं आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी कुठलीही शंका राहू नये, म्हणून रात्री अल्पवयीन आरोपीचं दुसरा ब्लड सँपल औंध येथील रुग्णालयात घेण्यात आलं होतं. ससूनमध्ये जे ब्लड सँपल गेले ते आरोपीचेच आहे की नाही हे तपासण्यासाठी हे दुसरे सँपल घेण्यात आले होते. काल आम्हाला जे रिपोर्ट प्राप्त झाले, त्यानुसार, औंधला दिलेलं सँपल हे आरोपीचं होतं, ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झालं. पण, ससूनचं सँपल हे अल्पवयीनचं नव्हतंच, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर डॉक्टरांना ताब्यात घेऊन चौकशी केली मग त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली.
आज त्यांना कोर्टासमोर हजर करुन पोलिस कोठडी मागणार, तसेच ते ब्लड सँपल कोणाचे होते याचाही शोध लावला जाईल. ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकणात खुनासारख्या गुन्हेगारी कटात सहभागी होणे, फसवणूक, पुरावे नष्ट करणे या अनुषंगाने कलम लावण्यात आले आहेत. डॉक्टरांविरोधात भक्कम, कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे आहे. याप्रकरणात आतापर्यंत ३ गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला हा अल्पवयीन आरोपीवर, दुसरा वडील आणि बार मालक-संचालकावर, तिसरा आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, आता या डॉक्टरांच्या फसवणूक प्रकरणात डॉक्टरांसोबतच अल्पवयीनचे वडील यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळा वळणं लागलेलं दिसून येत आहे.