Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भारताच्या एकतेचा आणि संविधानिक मूल्यांचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. १४/०४/२५,: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरविले जाते. बाबासाहेबांनी लोकशाही, सामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. राज्यपाल महोदयांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले. इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आज आपण जो एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत, त्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आधारस्तंभ आहे. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. देशातील सामाजिक विषमतेला आव्हान देत समता आणि बंधुत्वाचे मूल्य देशात रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार, संधीची समानता आणि आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास दिला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी यावेळी सांगितले.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे आजचा आधुनिक भारत घडला असून, त्यांच्या विचारांचे पालन करून संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा ठेवणे हीच त्यांच्या जयंतीला खरी आदरांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारताचे संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे. भारताच्या विकासात आणि प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेण्यात संविधानाची भूमिका मोलाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत शिक्षण, सामाजिक न्याय, औद्योगिक विकास आणि मानवी हक्कांचे जसे मोलाचे योगदान आहे, तसेच आधुनिक भारताच्या संरचनेतही त्यांचे कार्य अतुलनीय आहे. पाटबंधारे योजना, राष्ट्रीय विद्युत ग्रीड, कामगार हक्कांचे संरक्षण, तसेच अन्य महत्त्वाच्या धोरणांचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला दीर्घकालीन दिशा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व विचारांना अभिवादन करणे आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा राखत समता, बंधुता व न्याय यांचा अंगीकार करणे, हीच त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button