हप्ता वसुलीचे रेकॉर्डिंग व्हायरल; जळगावातील हेड कॉन्स्टेबल निलंबित, अंतर्गत कलेक्शन स्पर्धेमुळेच गेम झाल्याची चर्चा
अवैध वाळू तस्करांशी संगनमताचा आरोप

जळगाव – अवैध वाळू तस्करांकडून महिन्याच्या हप्त्याची मागणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलातील कथित ‘हप्ता संस्कृती’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुमारे २.२ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये इंगळे हे एका वाळू तस्कराशी थेट पैशांच्या व्यवहाराबाबत बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ११ मार्च रोजी दुपारी १२.४८ वाजताचा असल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये इंगळे हे महामार्गावरील बसथांब्यावर बसलेले असून त्यांनी चेहरा पांढऱ्या गमछाने अंशतः झाकलेला आहे.
संभाषणात संबंधित वाळू तस्कर खेडी परिसरातील चंदू अण्णा नगराजवळ दोन ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे सांगतो आणि त्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल, अशी विचारणा करतो. यावेळी तो पूर्वी दरमहा ५ हजार रुपये देत असल्याचे सांगतो. त्यावर इंगळे यांनी “४ हजार रुपये द्या” असे सांगत व्यवहार निश्चित करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.
याच चर्चेदरम्यान, पूर्वी कोणाला पैसे दिले जात होते, अशी विचारणा इंगळे करतात. त्यावर संबंधित व्यक्ती रावेर येथे बदली झालेल्या भूषण सपकाळे यांचे नाव घेतो. पुढे इंगळे हे सावखेडा शिवारातून वाळू उपसा करण्याचा सल्ला देताना दिसतात. तसेच, “काही टेन्शन नाही, बिनधास्त रहा” असा दिलासा देतानाही ते व्हिडिओमध्ये ऐकू येतात.
दरम्यान, या प्रकरणामुळे गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीमागील ‘अर्थपूर्ण’ यंत्रणा पुन्हा एकदा उघडकीस आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिस दलात वाळूशी संबंधित ‘सेक्शन’मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा असून, या व्यवहारांमधील ‘कलेक्शन स्पर्धा’मुळेच इंगळे यांचा पर्दाफाश झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या महिन्यातही कलेक्शनच्या वादातून पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. त्यापूर्वी शहर पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडून देण्यात आले होते. त्यामुळे पोलिस दलातील गट-तट आणि अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी इंगळे यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. “या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या कारवाईनंतरही जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी आणि त्याला मिळणाऱ्या कथित संरक्षणाबाबत अधिक व्यापक चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.












