भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेविका आमने-सामने, सभा पुन्हा तहकुब

भुसावळ : नगरपालिकेची तहकूब झालेली तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवार, 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पार पडली; मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तीव्र शाब्दिक वादामुळे ही सभाही गोंधळातच अडकली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.
सभेला सुरुवात होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी नगरसेविकांनी विरोध केल्याने आधी महिला आणि नंतर पुरुष नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद रंगला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती बिघडताच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृह सोडले.
यानंतर भाजप नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी सभा चालवावी, अशी मागणी केली; मात्र ती निष्फळ ठरली. वारंवार सभा तहकूब करण्याबाबत नियम काय, असा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला; परंतु स्पष्ट उत्तर मिळाले नाही. अखेरीस पुढील सभा सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, सभागृहात प्रवेश केलेल्या पत्रकारांना नगराध्यक्षांच्या सूचनेवरून बसण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांनी तीव्र निषेध नोंदवत सभागृह सोडले. या घटनेचा शहरातील पत्रकार संघटनांनी निषेध करत लोकशाही मूल्यांवर आघात होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.









