भुसावळ :गावठी पिस्टलसह मोकाट फिरणाऱ्या आरोपीस केले जेरबंद;गंभीर गुन्ह्याचा कट उधळला, ‘बाजारपेठ’ची कामगिरी
नाशिकमधून आलेला आरोपी जेरबंद !

भुसावळ : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्टलसह मोकाट फिरणाऱ्या एका आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात श्रीराम मंदिराजवळ एक इसम गावठी पिस्टलसह फिरत असून तो कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत आहे. माहितीची खात्री करून डी.बी. पथकाने तातडीने सापळा रचला. पोलिसांनी संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याची ओळख संदीप सुनील जाधव (वय २३, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, प्लॉट क्र. ३०३, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) अशी पटली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २०,००० रुपये किंमतीचे लोखंडी गावठी पिस्टल (कट्टा) मॅगझीनसह तसेच १,००० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, तसेच भुषण चौधरी, अमर अढाळे, योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बळीराम नेरकर हे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.












