भुसावळ: नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र ‘कुरमी’ ओबीसी जातीचे असल्याचे दाखवत त्या अपात्र होणार असल्याचा भाजपचा दावा
गायत्री भंगाळेंचे जात प्रमाणपत्र पडताळणी सिद्ध केल्यास निक्की बत्रा राजीनामा देणार

भुसावळ, दि.१७/०४/२०२६ — भुसावळातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यातील राजकीय वाद अधिकच चिघळला आहे. जळगाव येथे भंगाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देण्यासाठी आज भाजपकडून मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी गायत्री भंगाळे यांच्या सर्व आरोपांचे ठामपणे खंडन केले आहे.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मंत्री सावकारे अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. मात्र भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावत, “ही समितीमार्फत होणारी तपासणी व पडताळणी प्रक्रिया स्वतंत्र असून त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही,” असे स्पष्ट केले. भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र सध्या जात पडताळणी समितीकडे अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबतचा सत्य निर्णय समोर येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी युवराज लोणारी यांनी गायत्री गौर-भंगाळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र पत्रकार परिषदेत सादर करत त्या ‘कुरमी (ओबीसी)’ समाजातील असल्याचा दावा केला. तसेच नगराध्यक्षा पदासाठी दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक नियमांनुसार सहा महिन्यांत जात पडताळणी पूर्ण करणे बंधनकारक असताना संबंधित कागदपत्रे संशयास्पद असल्याने भंगाळे यांना त्यांचा जातीचा दावा सिद्ध करता येणारच नाही, असेही भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी म्हटलेलं आहे.
दरम्यान, भंगाळे यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रात फेरफार झाल्याचा मुद्दा देखील ते प्रमाणपत्र दाखवत उपस्थित करण्यात आला. नगरसेवक निक्की बत्रा यांनी पत्रकार परिषदेत संबंधित कागदपत्र दाखवत त्यावर खाडाखोड झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग व राज्य शासनाची दिशाभूल झाल्याचा दावा करत दोषींवर कठोर कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला. तसेच गायत्री भंगाळे यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून दावा सिद्ध करून दाखविल्यास ते त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे.
तसेच नगरपरिषदेच्या फार्म नंबर ४३ नियम नंबर ७४ वर भाडेकरूचे अथवा भोगवटाधारकाचे नावाखाली प्रेमनाथ कांता प्रसादच्या नावाखाली चमार असा जातीचा उल्लेख केलेला असून तसा उल्लेखच करता येत नसल्याचा दावा युवराज लोणारी यांनी केला आहे. ज्यांनी हे फेरफार केले असतील ते सर्व जेलमध्ये जातील, असा दावा युवराज लोणारी यांनी केला आहे.
भंगाळे यांनी शहरातील पाणीपुरवठा योजनेत अडथळे निर्माण होत असल्याचा आणि त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप केला होता. मात्र भाजपने हा आरोपही फेटाळत, त्यामागे राजकीय हेतू असल्याचे सूचित करत, शुद्ध पाणी पुरवठा करणे हे मंत्र्यांचे नाही तर नगराध्यक्षा यांचे काम असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाबाबत सुचना केल्या पाहिजेत.
दरम्यान, मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी भंगाळे यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचा दावा करत, भंगाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेली तक्रार नियमबाह्य असल्याचे भाजपने म्हटलेलं आहे.
दरम्यान, गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर या संपूर्ण वादाचे सत्य समोर येणार आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणातील हा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत चार नगरसेवक हे अनुसूचित जाती या प्रवर्गातून भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले आहेत. संपूर्ण भारतात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सर्वच ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचे काम भाजपने केले असल्याचा दावा नगरसेवक पिंटू कोठारी यांनी केला आहे.
यावेळी नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, निक्की बत्रा, राजेंद्र आवटे, परिक्षीत बऱ्हाटे, विशाल नाटकर, चेतन सावकारे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.












