Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रराजकीय

भुसावळ: आमदाराच्या वाहनावरील फॅन्सी नंबर प्लेट ५०० रू. दंड, काँग्रेसचा’ संघटन सृजन अभियान’ मेळावा उत्साहात;

भुसावळ (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत भुसावळ-जळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मात्र भुसावळमधील या मेळाव्यात भुसावळ काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आल्याचे चित्र समोर आले.


शनिवार (दि. ४ एप्रिल) रोजी दुपारी १ वाजता भुसावळ येथील महात्मा गांधी पुतळा परिसरातील हॉटेल ग्रीन लीफ येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात सुरू असलेले ‘संघटन सृजन अभियान’ हे पक्षाला तळागाळापर्यंत बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, महाराष्ट्रातही या अभियानाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. प्रमोद कुमार, अकोला पश्चिमचे आमदार तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक साजिद खान पठाण, जिल्हा निरीक्षक आरीज बेग मिर्जा, प्रदेश सरचिटणीस डॉ. कोलते, माजी आमदार रमेश चौधरी, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी जिल्हा, शहर व तहसील स्तरावरील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ‘संघटन सृजन अभियान’ कसे प्रभावीपणे राबवायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेते तळागाळाशी संवाद साधत असतानाच भुसावळ काँग्रेसमधील गटबाजीचे वास्तवही समोर आले. बैठकीला अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू होती. स्थानिक पातळीवर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि वाढती गटबाजी यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची चर्चा रंगली.
दरम्यान, भुसावळातील या बैठकीस उपस्थित असलेल्या आमदार साजिद खान पठाण यांच्या चारचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट आढळून आल्याने शहर वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनावर ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच वाहनावर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाचे स्टिकर लावण्यात आले असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारचे स्टिकर केवळ संवैधानिक पदावरील व्यक्तींनाच वापरण्याची परवानगी असताना त्याचा वापर झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
एकीकडे ‘संघटन सृजन अभियान’द्वारे पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे स्थानिक स्तरावरील गटबाजी ही काँग्रेससमोर मोठे आव्हान असल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp